गुजरातमध्ये 5 हजार कोटीचे कोकेन जप्त
गेल्या 10 दिवसांमध्ये देशभरात 13 हजार कोटीचे अमली पदार्थ हस्तगत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गुजरातच्या अंकलेश्वर या शहरातील अवकार ड्रग्ज लिमिटेड या कंपनीवर घातलेल्या धाडीत 5 हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे 518 किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे. दिल्ली आणि गुजरात पोलिसांच्या सहकार्यवाहीत ही धाड सोमवारी टाकण्यात आली होती. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून एका मोठ्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात यश आले आहे.
दिल्लीत 2 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबर या दोन दिवसांमध्ये अमली पदार्थांचे दोन मेठे साठे जप्त करण्यात आले होते. त्याच रॅकेटशी गुजरातमधील साठ्याचाही संबंध होता. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार विरेंदर बसोया हा असून त्याचे दुबईत अनेक व्यवसाय आहेत, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
पाच जणांना अटक
गुजरातमध्ये सोमवारी घालण्यात आलेल्या धाडीत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीतील हस्तक एकमेकांशी सोशल मिडियाच्या माध्यमातून संपर्क करत होते. ते एकमेकांना व्यक्तिश: ओळखत नव्हते. दुबईतील मुख्य सूत्रधाराच्या माध्यमातून त्यांचा एकमेकांशी संपर्क होत असे, अशी माहिती दिल्ली आणि गुजरात पोलिसांनी या रॅकेटसंदर्भात सोमवारी दिली.
दक्षिण अमेरिकेतून...
गुजरातमधील कोकेनचा साठा दक्षिण अमेरिकेतून आलेला होता. अशी माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. गुजरातमधील हा आतापर्यंत हाती लागलेला अमली पदार्थांचा सर्वात मोठा साठा आहे. तो अन्य वस्तूंच्या पोत्यांमध्ये लपविण्यात आलेला होता. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी या अवकार कंपनीच्या गोदामावर धाड टाकली. त्या धाडीत हा साठा हस्तगत करण्यात आला.
सांकेतिक क्रमांक
या टोळीतील सदस्यांना सांकेतिक ओळख क्रमांक दिले गेले होते. पोलिसांना सुगावा लागू नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. या टोळीचे सूत्रसंचालन भारताबाहेरुन केले जात होते. हे अमली पदार्थ भारतात विकण्यासाठी, तसेच भारताबाहेर पाठविण्यासाठी आणण्यात आलेले होते. 10 ऑक्टोबरला दिल्लीत 2 हजार कोटी रुपयांचे 208 किलो कोकेन जप्त करण्यात आले होते. तर 2 ऑक्टोबरलाही दिल्लीत 560 किलो कोकेन आणि 40 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. याची किंमत 5 हजार कोटी रुपये इतकी होती.
भोपाळमध्येही छापे
5 ऑक्टोबरला मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे टाकलेल्या धाडीत 1,800 कोटी रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले होते. त्या धाडीत दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. या अमली पदार्थांचा संबंध याच टोळीशी आहे काय, याचा शोध घेण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात देशभर अशा अनेक धाडी टाकण्यात आल्या असून लहान-मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले. भारताला अमली पदार्थांचे खरेदी-विक्री केंद्र होऊ देण्यात येणार नाही, असा निर्धार केंद्र सरकारने केला असून पोलीस आणि केंद्रीय अन्वेषण संस्थांना कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
10 दिवसांमध्ये 13 हजार कोटी
गेल्या 10 दिवसांमध्ये देशभरात जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 13 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. दोन आठवड्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आजवरच्या इतिहासात कधी जप्त करण्यात आले नव्हते. दिल्ली, मध्यप्रदेश आणि गुजरात पोलिसांनी अमली पदार्थांच्या विरोधात मोठी आघाडी उघडली असून तरुण पिढीचा सर्वनाश करणाऱ्या या पदार्थांना देशात थारा मिळता कामा नये, असा निग्रह केल्याची माहिती देण्यात आली आहे. भारत दिवसेंदिवस अमली पदार्थांचे जागतिक केंद्र बनत चालल्याचा इशारा या संदर्भात अनेक सामाजिक संस्थांनी दिला असून पंजाब आणि ईशान्य भारतातील राज्ये मोठ्या प्रमाणात नशेच्या आधीन होऊ लागली आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ही तस्करी मोडून काढली नाही, तर भविष्यकाळात देश मोठ्या संकटात सापडल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
देशव्यापी अभियान
ड अमली पदार्थांविरोधात केंद्र सरकारच्या पुढाकाराने देशव्यापी अभियान
ड गेल्या सहा महिन्यांमध्ये हजारो कोटी रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत
ड अफगाणिस्तान, पाकिस्तान, दक्षिण अमेरिकेतून या पदार्थांची आयात