42 कोटींचे कोकेन बिहारमध्ये जप्त
धागेदोरे थायलंडपर्यंत असल्याची माहिती उघड
वृत्तसंस्था/ पाटणा
अमली पदार्थ आणि कोकेनची तस्करी आता फक्त दिल्ली, मुंबई किंवा गुजरातपुरती मर्यादित राहिलेली नसून बिहारमध्येही पोहोचली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) बिहारमधील मुझफ्फरपूर जिह्यात एका व्यक्तीकडून 42 कोटी ऊपयांचे कोकेन जप्त केले आहे. थायलंडमधून भारतात पोहोचलेल्या या अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये भारतीय नागरिकाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. डीआरआय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
13 नोव्हेंबर रोजी मुझफ्फरपूर जिह्यात एका भारतीय नागरिकाकडून 4.2 किलो कोकेन जप्त केले असून आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत 42 कोटी ऊपये असल्याचे सांगण्यात येत आहे. अटक केलेल्या व्यक्तीच्या ट्रॉली बॅगची अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता बॅगच्या वरच्या आणि खालच्या भागात अमली पदार्थ लपवल्याचे आढळून आले. याप्रकरणी एका तस्कराला अटक करण्यात आले असले तरी आरोपीचे नाव अद्याप अधिकाऱ्यांनी उघड केलेले नाही. मात्र, आरोपी अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीचा भाग असल्याचा संशय आहे.