कोल इंडियाच्या कोळसा उत्पादनात 8 टक्के वाढ
पहिल्या तिमाहीत उत्पादन 18.93 कोटी टनवर
नवी दिल्ली :
सरकारी मालकीची कोळसा उत्पादक कंपनी कोल इंडिया लिमिटेड यांनी चालु आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत 18.93 कोटी टन इतक्या कोळशाचे उत्पादन घेतले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मागच्या वर्षी याच कालावधीमध्ये 17.55 कोटी टन इतक्या कोळशाचे उत्पादन घेण्यात आले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जूनच्या तिमाहीत उत्पादनात 8 टक्के वाढ झाली आहे.
कोल इंडिया लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. कंपनीने 18.92 कोटी टन कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट यशस्वीपणे पार केले असून कंपनीला याचे अत्यंतीक समाधान वाटते आहे. देशाच्या एकूण कोळसा उत्पादनामध्ये कोल इंडियाचा वाटा 80 टक्के इतका आहे. कोळसा उत्पादनात कोल इंडिया ही सर्वात मोठी कंपनी म्हणून नावाजलेली आहे.
जूनमध्ये उत्पादन वाढले
जून महिन्यात कंपनीचे उत्पादन 9 टक्के इतक्या वाढीसह 6.3 कोटी टन इतके झाले होते. जून 2023 मध्ये हेच उत्पादन 5.8 कोटी टन इतके होते. मजबूत उत्पादनामुळे एप्रिल ते जून या तिमाहीत कोल इंडियाने दमदार उत्पादन प्राप्त करण्यामध्ये यश मिळविले आहे. कंपनीने 19.84 कोटी टन कोळशाचा पुरवठा पहिल्या तिमाहीमध्ये केला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात देशामध्ये विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. परिणामी कोळशाची मागणी देखील सदरच्या कालावधीमध्ये अधिक दिसून आली.
इतका केला पुरवठा
पहिल्या तिमाहीमध्ये कोळशावर आधारीत उर्जा निर्मिती कंपन्यांना 16 कोटी टन इतका कोळसा पुरविला होता. आर्थिक 2023-24 या कालावधीत समान अवधीत 15.4 कोटी टन कोळशाचा पुरवठा करण्यात आला होता.