मुख्यमंत्री फडणवीस, गडकरी यांच्या स्वप्नातले टेक्सटाईल पार्क नागपूरात उभारावे
आमदार प्रवीण दटके यांची मागणी
नागपूर
नागपूरातील उमरेड रोड येथील विणकर सूतगिरणी मर्यादितच्या मालकीची ८८ एकर जमिन विकून आलेल्या निधीतून नवीन टेक्सटाईल पार्क व्हावे अशी मागणी मंगळवारी आमदार प्रवीण दटके यांनी केली. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या दालतना झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीकडे उमरेड रोडवर स्व- मालकीची ८८ एकर जमीन होती. परंतु काही काळाने ही सूतगिरणी अवसायनात काढण्यात आली. एकण ८८ एकर जमिनीपैकी ४२ एकर जमीन ही नागपूर सुधार प्रन्यास, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ तसेच लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेसाठी विकण्यात आली. उर्वरित जमिनीपैकी सूतगिरीकडे सध्या २० एकर जमिन शिल्लक आहे. त्याठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातले अत्याधुनिक टेक्सटाईल पार्क उभारावे अशी मागणी या बैठकीत आमदार दटके यांनी केली.
आमदार दटके यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला मंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली असून. वस्त्रोद्योग विभागाकडे असलेल्या सर्व जमिनींची सध्य स्थितीची पाहणीकरून शिल्लक जमीन वापरात आणणार आहे, अशी माहिती मंत्री संजय सावकारे यांनी यावेळी दिली. या बैठकीला अविनाश खळतकर, नागपूर जनकल्याण मंचचे रमण पैगवार, राजेश डोरलीकर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.