जिल्ह्यातील पाणी योजनांचा मुख्यमंत्री-पालकमंत्र्यांकडून आढावा
बेळगाव : कागवाड तालुक्यातील (केंपवाड) बसवेश्वर पाणीयोजना, रामदुर्ग तालुक्यातील वीरभद्रेश्वर व सोलापूर ठिबक सिंचन पाणी योजनांचा आढावा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी सुवर्ण विधानसौधमध्ये बैठकीत घेतला. अथणी व कागवाड तालुक्यातील दुष्काळग्रस्त 22 गावांच्या 27 हजार 462 हेक्टर जमिनीला बसवेश्वर सिंचन योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 2017 मध्ये या योजनेला चालना देण्यात आली आहे. आतापर्यंत 1158 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 90 टक्के कामे पूर्ण झाली असून जूनअखेरपर्यंत प्राधान्य क्रमाने योजनेची कामे पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली. ही योजना पूर्ण करण्यासाठी 652 एकर भूसंपादन करण्यात येणार आहे.
ही प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असून योजनेची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जमिनीला पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रामदुर्ग, मुधोळ व बदामी तालुक्यातील 22 दुष्काळग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सालापूर सिंचन योजना हाती घेण्यात आली आहे. 80 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बेळगाव व बागलकोट जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त 34 गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी वीरभद्रेश्वर सिंचन योजनेची कामे वेळेत पूर्ण करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधानसभेतील मुख्य प्रतोद अशोक पट्टण, कागवाडचे आमदार राजू कागे आदींसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.