क्लब वर्ल्डकप : बायर्न म्युनिक, पॅरिस सेंट-जर्मेनचे दणदणीत विजय
वृत्तसंस्था/ सिनसिनाटी, ओहिय़ो
बुंडेसलिगा विजेत्या बायर्न म्युनिकने रविवारी रात्री टीक्युएल स्टेडियमवर ऑकलंड सिटीचा 10-0 असा दणदणीत पराभव करत त्यांच्या फिफा क्लब वर्ल्डकप मोहिमेची सुऊवात जोरदार पद्धतीने केली. या विजयात तीन खेळाडूंनी प्रत्येकी दोन गेले आणि त्यात थॉमस मुलरचा समावेश राहिला, तर जमाल मुसियालाने शानदार हॅट्ट्रिक केली.
सहाव्या मिनिटाला जवळून हेडर हाणून किंग्सले कोमनने न्यूझीलंडस्थित क्लबच्या दणदणीत पराभवाची सुरुवात केली. त्यानंतर जर्मन संघाने आक्रमणाची धार वाढवत साचा बोई (18 व्या मिनिटाला), मायकेल ओलिस (20 व्या मिनिटाला) आणि कोमन (21 व्या मिनिटाला) यांच्या माध्यमातून तीन जलद गोल केले, ज्यामुळे घड्याळात 30 मिनिटे होण्यापूर्वीच ऑकलंड सिटी संघ धोकादायक स्थितीत पोहोचला. 25 वर्षांपासून क्लबशी जोडलेला मुलर 45 व्या मिनिटाला एक उत्तम व्हॉलीद्वारे गोल करणाऱ्या खेळाडूंत सामील झाला आणि ओलिसने (पहिल्या सत्रातील अतिरिक्त तिसऱ्या मिनिटाला) लांब अंतरावरून डाव्या पायाने फटका हाणून संघाची आघाडी 6-0 अशी केली.
दुसऱ्या सत्रात जमालला चमक दाखविण्याची संधी मिळून त्याने 67 व्या मिनिटाला शानदार लांब पल्ल्याच्या फटक्याने सुऊवात केली आणि त्यानंतर पेनल्टीचे रुपांतर (73 व्या मिनिटाला) केले. त्याने 84 व्या मिनिटाला गोलकीपर कॉनोर ट्रेसीच्या चुकीचा फायदा घेत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. 89 व्या मिनिटाला मुलरने गोल करून यात भर टाकली.
सामन्यानंतर बायर्नचे प्रशिक्षक व्हिन्सेंट कॉम्पनी यांनी फिफाच्या अधिकृत वेबसाइटवर म्हटले की, आम्हाला सध्या कौतुकाची किंवा अशा कोणत्याही गोष्टीची गरज नाही, आम्ही फक्त आमचे काम केले. आम्ही खूप गंभीरपणे खेळलो. आम्हाला जे करायचे होते ते आम्ही केले आणि कदाचित या गटात गोल फरक बिनमहत्त्वाचा नाही. मुलर म्हणाला की, स्टेडियम भरलेला होता, आमचे चाहते खरोखरच खेळात रस घेत होते आणि खेळावर प्रतिक्रिया देत होते, विशेषत: गोलचा आनंद साजरा करत होते. माझ्या शेवटच्या गोलनंतर मी त्यांच्यासोबत आनंद साजरा करण्याचा एक उत्तम क्षण अनुभवला. खूप मजा आली. एकंदरित पाहता खूप चांगली सुऊवात झाली. नक्कीच आमचे पारडे जड होते, पण आम्ही त्या भूमिकेला जागलो, असे त्याने पुढे सांगितले.
दुसरीकडे, यूएफा चॅम्पियन्स लीग विजेते पॅरिस-सेंट जर्मेनने उष्ण आणि ऊन पडलेल्या परिस्थितीत अॅटलेटिको दी माद्रिदला 4-0 असा पराभव केला. 2024-25 च्या ऐतिहासिक मोहिमेत लीग 1, कूप दी फ्रान्स आणि यूएफा चॅम्पियन्स लीग जिंकणाऱ्या फ्रेंच दिग्गजांनी 19 व्या मिनिटाला फॅबियन ऊईझच्या बॉक्सच्या बाहेरून हाणलेल्या फटक्याच्या जोरावर त्यांच्या वर्चस्वाला सुऊवात केली. ज्युलियन अल्वारेझच्या सुऊवातीच्या प्रयत्नांनंतरही अॅटलेटिकोला पीएसजीच्या बचावफळीला भेदताना संघर्ष करावा लागला.
45 व्या मिनिटाला विटिन्हाच्या आणखी एका प्रहाराने पहिल्या सत्राच्या शेवटी त्यांची आघाडी दुप्पट केली. अॅटलेटिकोने काही प्रयत्न केले असले, तरी पीएसजीचा बदली खेळाडू सेनी मायुलूच्या फटक्याने आघाडी तिप्पट केली आणि 87 व्या मिनिटाला प्रतिस्पर्ध्यांच्या पुनरागमनाची शक्यता संपविली. त्यानंतर अतिरिक्त वेळेत रॉबिन ले नॉर्मंडच्या हँडबॉलने पीएसजीला गोल करण्याची आणखी एक संधी दिली आणि ली कांगिनने सहज पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केले.