For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे कहर

06:24 AM Apr 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे कहर
Advertisement

रामबनमध्ये पूर-भूस्खलनात तिघांचा मृत्यू, 100 जणांना वाचवण्यात यश

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये पाऊस पडत असतानाच ढगफुटीमुळे अचानक पूर आल्याने हाहाकार उडाला. रविवारी सकाळी रामबन जिल्ह्यातील सेरी बागना भागात पावसानंतर झालेल्या ढगफुटीत तीन जणांचा मृत्यू झाला. यादरम्यान पोलिसांनी सुमारे 100 लोकांना वाचवले. डोंगरावरून आलेला दगड-माती यांचा ढिगारा गावात घुसल्याने अनेक लोक आणि घरांना फटका बसला. एनडीआरएफ आणि लष्कराकडून सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

Advertisement

अचानक आलेल्या पुरामुळे रामबनसह खोऱ्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. अनेक ठिकाणी पुरामुळे कोसळलेल्या घरांच्या ढिगाऱ्याखाली फक्त वाहनांची छप्परे दिसत होती. तसेच काही मार्गही बंद झाले असून राष्ट्रीय महामार्गावर अनेक वाहने अडकली आहेत. अनेक रस्त्याच्या बाजूपट्ट्या वाहून गेल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. भूस्खलनाचे काही व्हिडिओ समोर आले असून त्यामध्ये डोंगरावरून ढिगारा पडताना दिसत आहे. काही भागात डोंगराचा ढिगारा रस्ते आणि निवासी भागात पोहोचला आहे. एका व्हिडिओमध्ये तीन-चार टँकर आणि काही इतर वाहने पूर्णपणे ढिगाऱ्याखाली गाडलेली दिसत आहेत. याशिवाय, हॉटेल्स, पोलीस स्थानक, शाळा आणि घरांनाही ढिगाऱ्यांचा फटका बसल्याचे दिसून येते.

दुसरीकडे, रामबन जिल्ह्यातील बनिहाल भागात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. शेकडो वाहने अडकली आहेत. किश्तवार-पद्दर रस्ता देखील बंद आहे. येथे वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. हवामान स्वच्छ झाल्यानंतरच महामार्गावरून प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. रामबन जिल्ह्यातील चिनाब नदीजवळील धर्मकुंड गावात भूस्खलन झाले आहे. 10 घरे पूर्णपणे खराब झाली, तर 25-30 इतर घरांचेही नुकसान झाले. येथे धर्मकुंड पोलिसांनी 90 ते 100 लोकांना सुरक्षितपणे वाचवले. रामबन जिह्यात झालेल्या प्रचंड विनाशाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) टीम रामबनमध्ये पोहोचली आहे.

उधमपूर जिल्ह्यात झाडे कोसळली, वीजपुरवठा खंडित

उधमपूर जिल्ह्यातील सतैनी पंचायतीतही मुसळधार पाऊस आणि वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात अनेक झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक आणि वीज पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या 4-5 वर्षांत पहिल्यांदाच इतके जोरदार वारे वाहताना दिसत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

राज्यात पुढील 2-3 दिवस मुसळधार पाऊस

भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) मते, जम्मू काश्मीरमध्ये पुढील 2-3 दिवस पाऊस सुरूच राहू शकतो. विशेषत: डोंगराळ आणि उंच भागात गडगडाटी वादळासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. रामबन, उधमपूर, पुंछ आणि बारामुल्ला जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येथे लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मदतीचे आश्वासन

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या नैसर्गिक आपत्तीबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. रामबनमध्ये भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुराच्या दु:खद घटनेने मला खूप दु:ख झाले आहे. या कठीण काळात आपल्या संवेदना पीडित कुटुंबांसोबत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ढगफुटी झालेल्या भागात स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मदत व बचावकार्य राबविले जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून संबंधित यंत्रणांना मदत, बचाव आणि पुनर्वसन योजनांचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रशासनाच्या सतत संपर्कात : केंद्रीय मंत्री

केंद्रीय मंत्री आणि उधमपूरचे भाजप खासदार डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर घटनेची माहिती दिली. या घटनेबाबत आपण उपायुक्त बसीर-उल-हक चौधरी यांच्या सतत संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रसंगी त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या बचावकार्याचे कौतुक केले. आपद्ग्रस्तांना प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. तसेच गरज पडल्यास आपण वैयक्तिक संसाधनांसह देखील मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकांच्या मदतीसाठी लष्करही आले धावून

भारतीय सैन्याने रामबनजवळील राष्ट्रीय महामार्ग-44 वर अडकलेल्या लोकांना मानवतावादी मदत पुरवली आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग-44 वर रामबनजवळ शेकडो लोक अडकले होते. यामध्ये महिला, मुले आणि वृद्धांचाही समावेश होता. हे लोक अन्न, पाणी आणि वैद्यकीय सुविधांच्या कमतरतेमुळे त्रस्त होते. अशा संकटाच्या काळात भारतीय सैन्याने पुन्हा एकदा मदत पुरविली. अडकलेल्या प्रवाशांची माहिती लष्कराला मिळताच परिसरात तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. लष्कराने गरजूंना अन्नाचे पॅकेट, पिण्याचे पाणी आणि प्रथमोपचार सुविधा पुरवल्या. लष्कराच्या जवानांनी केवळ मदत साहित्य वाटले नाही तर रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात मदत केली आणि वाहतूक पूर्ववत करण्याच्या प्रयत्नात स्थानिक प्रशासनाला सहकार्य केले.

Advertisement
Tags :

.