तिरुपति मंदिर व्यवस्थापनात आणखी एक घोटाळा
रेशीमच्या जागी पॉलिएस्टरचे शाल
वृत्तसंस्था/ तिरुपति
आंध्रप्रदेशच्या तिरुमला तिरुपति देवस्थानम मंदिरात लाडू घोटाळ्यानंतर आता आणखी एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. 2015-25 पर्यंत भाविक-देणगीदारांना देण्यात येणाऱ्या पवित्र रेशीम शाल प्रत्यक्षात 100 टक्के पॉलिएस्टरचे होते असा ट्रस्टचा आरोप आहे.
लाडू वाद आणि परकमानी प्रकरणासोबत प्रसिद्ध तिरुमाला मंदिराचे संचालन करणाऱ्या ट्रस्टने आता मागील एक दशकात रेशमी शाल विकणाऱ्या एका कंपनीने कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
नियमानुसार प्रत्येक शालमध्ये शुद्ध शहतूत रेशी आणि रेशीम होलोग्राम असणे अनिवार्य होते, परंतु पुरवठादाराने स्वस्त पॉलिएस्टर देत सुमारे 55 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. कंपनीने शुद्ध शहतूत रेशीमऐवजी 2015-25 पर्यंत तिरुमाला तिरुपति देवस्थानमला 100 टक्के पॉलिएस्टरचे शाल विकले आहेत.
टीटीडी अध्यक्ष बी.आर. नायडू यांच्या अध्यक्षतेखालील बोर्डाने पूर्ण प्रकरण आंधप्रदेश एसीबीला चौकशीसाठी सोपविले आहे. शालच्या तपासणीसाठी गोदाम आणि मंदिर परिसरातून नमुने मिळविण्यात आले आणि बेंगळूर आणि धर्मवरम येथील सेंट्रल सिल्क बोर्ड प्रयोगशाळेत तपासणी करविण्यात आली. यात सर्व शाल पॉलिएस्टरचे होते याची पुष्टी मिळाली आहे.
नव्या कंत्राटाला स्थगिती
शाल पुरवठादार व्हीआरएस एक्सपोर्ट्सला अलिकडेच आणखी 15 हजार शालींसाठी कंत्राट देण्यात आले होते. आता या कंत्राटाला स्थगिती देण्यात आली आहे. तिरुमाला मंदिरात व्हीआयपी दर्शनादरम्यान रंगनायकुला मंडपममध्ये वेदासिरवाचनमच्या वेळी टीटीडी देणगीदार आणि अन्य भाविकांना रेशमी शाल प्रदान करते. मंदिराच्या नियमांनुसार शाल पूर्णपणे शुद्ध शहतूत रेशीमने तयार केलेली असणे आवश्यक आहे.