कडोलीत ढगफुटीसदृश पाऊस : घरांमध्ये शिरले पाणी
नाले दुथडी भरून वाहू लागले : तब्बल चार तास झालेल्या विक्रमी पावसाने उडविली शेतकरी-ग्रामस्थांची झोप
वार्ताहर /कडोली
तब्बल चार तास मंगळवारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने झोडपून काढल्याने कडोली परिसरातील शेतशिवारांसह सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नालेही दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने तारांबळ उडाली. कडोली परिसरात सोमवारी साधारण पावसाची हजेरी झाली होती. पण मंगळवारी एका दिवसात तब्बल चार तास विक्रमी पावसाने हजेरी लावल्याने सर्वांची तारांबळ उडाली. नॉनस्टॉप पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना पावसात घराकडची वाट धरावी लागली. विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यामुळे ग्रामस्थांना बाहेर पडणेही मुश्कील झाले होते.
या पावसामुळे शेतशिवारात पाणीच पाणी होऊन बांधही फुटण्याच्या घटना घडल्या. शिवारात पाणी भरून गेल्याने कोबी, भाजीपालासह अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. यावेळी पावसाचा मोठ्या प्रमाणात मारा झाल्याने पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. कडोली गावच्या उत्तरेकडील पेठ गल्लीत जोतीबा मंदिरपासून असलेल्या गटारीची स्वच्छता करण्यात आली होती. गटार पूर्णपणे केरकचऱ्याने भरली होती. त्यामुळे गटारीतून पाणी न जाता रस्ता ओलांडून उलट दिशेला असलेल्या घरातून पाणी शिरल्याने तेथील लोकांची तारांबळ उडाली. ग्रा. पं.च्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मात्र मनस्ताप झाल्याचे पहावयास मिळाले. गटारी स्वच्छ करून पाणी निचरा होण्यासाठी कोणतीच कृती न झाल्याने ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.
गौरी नालाही दुथडी भरून
अवकाळी पावसाने तब्बल चार तास हजेरी लावल्याने सर्व नालेही भरून वाहत होते. तर गौरी नालाही यावेळी मे महिन्यात प्रथमच दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र दसत होते.