कोल्हापूरला ‘दादा’ नेतृत्वाची गरज...!
संतोष पाटील प्रतिनिधी
आपला मतदार संघ, जिल्हा तसेच राज्यभर आवश्यक ठिकाणी भरघोस निधी कसा आणायचा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करायची याची मेख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखी खचितच राज्यात कोणाकडे असेल. दादांचा आतापर्यंतचा एकूण विकासकामांचा झपाटा व त्यावर दृष्टीक्षेप टाकल्यानंतर लक्षात येते. पुणे शहराचा चेहरा मोहरा त्यांनीच बदलला. याच पार्श्वभूमीवर रंकाळा संवर्धन, अंबाबाई आराखडा, शाहु मिल जागेचा विकास, शहरातील रस्ते बांधणी, इंटरनॅशनल कन्व्हेक्शन सेंटर आदीसाठीची ना. पवार यांची तळमळ एका दिवसाच्या दौऱ्यात स्पष्टपणे दिसून आली. आपल्याच मतदार संघातील काम असल्यासारखे अजितदादांनी यंत्रणेला दर्जा आणि कामाच्या निपटाऱ्याबाबत फैलावर घेतले. एकच वादा अजितदादा हे लोकप्रिय वाक्य यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले असले तरी संपूर्ण जिल्हा नजरेपुढे ठेवून कोल्हापूर माझं आहे, या भावनेतून काम करणाल्या नेतृत्वाची वाणवा असल्याचं कटूसत्य पुन्हा पुढे आले.
प्रशासनावर कमालीचा वकूब असलेल्या ना. अजित पवार आणि कोल्हापूरचे ऋणानुबंध नेहमीच त्यांच्या दौऱ्यातून स्पष्टपणे जाणवतात.
अर्थमंत्री या नात्याने कोल्हापूरला देताना अजित पवार यांनी कायम हात सैल सोडला आहे. अंबाबाई मंदिरा आराखड्यासाठी निधीची उपलब्धता करताना, मागणी आठशे कोटी रुपयांची असताना ना. पवार यांनी हजार कोटी रुपये मंजूर केले. काही कसूर राहता कामा नये असेही बजावले. कन्व्हेक्शन सेंटरसाठी तीनशे कोटी रुपयांचा निधी आणि कामाची सुरूवात यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सोमवारी, 30 जानेवारीच्या दौऱ्यात ना. पवार यांनी सकाळी सहा वाजताच कोणताही लवाजमासोबत न घेता, रंकाळा परिसराची पाहणी केली. तिथे सुरू असलेल्या साडेनऊ कोटी रुपयांत काय-काय सुरू आहे, हे याची देही याची डोळा पाहिले. याचवेळी शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतुकीची कोंडीचा प्रश्नही हेरला. शाहु मिल जागेचा विकास हा जटील प्रश्न हाती घेवून त्याचे निकराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कोल्हापूरच्या विकासाबाबत अजित पवार यांची तळमळ पूर्वीप्रमाणे यावेळीही दिसून आली. जे अजित पवार यांना दिसते, त्यांना कोल्हापूरसाठी करावेसे वाटते, त्यासाठीचे कष्ट आणि पाठपुरावा करण्याची त्यांची तयारी असते. तीच तळमळ तेच कष्ट तो प्रामाणिक पाठपुरावा जिह्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडे दिसत नाही. आपला मतदार संघ आणि हुकमी मते यातच नेते अडकून पडले आहेत. निधीची घोषणा करायची, उद्घाटनाचा नारळ फोडून माध्यमात वाह-वाह झाली की विषय संपला, हेच कोल्हापुरातील विकासकामांचे घोषवाक्य ठरले आहे. अजितदादांकडून नेत्यांनी बोध घ्यावा यासह पवार यांनीही स्थानिक नेत्यांना विकास कोणत्या गावाचा असतो हेही दाखवून द्यावे.
अजित पवार कुटुंबियांचे जवळचे नातेवाईक कोल्हापुरात आहेत. मोठ्या पवारांचे आजोळ कोल्हापुरातील आहे. अजित पवार हे महाविद्यालयिन शिक्षणासाठी काही काळ कोल्हापुरात होते. पुणे-सातारा नंतर कोल्हापूर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. पवारांचे ऋणानुबंध कोल्हापुरशी आहेत. हे नाते विकासाच्या सेतूने अधिक घट्ट व्हावेत. पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामतीचा स्वप्नवत विकास करणाऱ्या ना. पवार यांनी कोल्हापूरच्या विकासाचं उत्तरदायित्व घेण्याची वेळ आली आहे. कारण कोल्हापूरचं सर्वपक्षीय नेतृत्व सर्वांगिण विकास करण्यात खुजं ठरल्याचे कटू वास्तव आहे. मागील अनेक वर्षांपासून पंचगंगा प्रदूषण, अंबाबाई आराखडा, खंडपीठ, शहरात उ•ाण पुलासह चकचकीत रस्ते, हद्दवाढ, वाहतुकीची कोंडी, कचऱ्याचे निराकरण हे प्रश्न कागदावरच आहेत. निवडणूक आणि राजकीय इर्षेपलीकडे जावून कोल्हापूरचा सर्वांगीण विकास आणि रखडलेल्या योजनांसह नवीन प्रकल्पासाठी तळमळ आणि प्रयत्न करणारे नेतृत्व कोल्हापूरला लाभले नाही, हे कोल्हापूरच्या विकासाच स्वप्न ना. पवार यांच्यानिमित्ताने पूर्ण व्हावे, ही सर्वसामान्य कोल्हापूरकरांची इच्छा आहे.
हद्दवाढ आणि विरोधाच्या बाजूने निवडणुका जवळ आल्या की वातावरण तापवून गरम डाव केला जातो. कोल्हापूरच्या हद्दवाढीला पर्याय म्हणून पुढे आलेलं प्राधिकरण म्हणजे निव्वळ अडवणूक आहे. महापुराच्या बाबतीतही तेच रडगाणे आहे. पुणे लगतच्या मुळा-मुठा नदीमुळे शहराला महापुराच धोका निर्माण झाला नाही. या नद्यांची खोली-रुंदी गरजेनुसार वाढवली आहे. या नद्यांचे पात्र इतके रुंद आहे की, कितीही पाणी आले तरी नागरी वस्तीत येत नाही. कोल्हापुरात मात्र जुलै-ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यावर मागील महापुरातील प्रलयाची आठवणीने प्रशासन आणि राजकारणी जागे होतात. मागील पंधरा वर्षात शेकडो कोटी रुपयांचा निधीच्या खर्चासह नमो: गंगै: च्या धर्तीवर नमो: पंचगंगा उपक्रम करुनही पंचगंगा मैलीच कशी याचा स्थानिक नेत्यांना कधीही प्रश्न पडला नसेल काय ?
तीन दशकं कोल्हापूरकर खंडपीसाठीसाठी लढत आहेत. आंदोलनाची दाहकता वाढली तरच कोल्हापूरच्या नेतेमंडळींना खंडपीठाची आठवण होते. शाहू मिलच्या 27 एकर जागेवर भव्य स्मारक करण्याचे नियोजन मागील एक तपापासून कागदावरच आहे. प्रशासनाने शाहू शताब्दी वर्ष सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणात घालवले. शताब्दी वर्षात शाहूमिल जागेच्या विकासासाठी प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्याचे धारिष्ठ्याही नेत्यांनी का दाखवले नाही. ना. पवार यांच्यामुळे अंबाबाई विकास आराखड्यासाठी हजार कोटींची तरतूद झाली. हा आराखडा सक्षमपणे व्हावा, याची जबाबदारी आता येथील सर्वपक्षीय नेत्यांची आहे. हलक्या पावसातही शहरातील अनेक रस्त्यात ठिकाणी पाणी साचते.
आयआरबीने केलेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी वर्षाला किमान 25 कोटी रुपयांची गरज आहे. महापालिकेने मागणी करुनही निधी मिळत नाही. शहरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी नियमित निधी यावा, या निधीतून दर्जेदार काम व्हावे, यासाठी पामाणिक पाठपुरावा कोण करणार ? निधीचा योग्य, गरजेनुसार आणि वेळेत विनिययोग होतो का नाही याकडे अजित पवार लक्ष वेधतात, मात्र ते कोल्हापूरच्या नेते याकडे कानाडोळा का करतात ?