कावळा नाका येथील केबिन जप्त
कोल्हापूर :
कावळा नाका येथील केबिन जप्त करण्याची कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने केली. हे प्रकरण न्याय प्रविष्ठ होते. अखेर मनपाच्या बाजूने निर्णय झाल्याने ही कारवाई बुधवारी केल्याची माहिती अतिक्रमण निर्मुलन पथकाचे प्रमुख विलास साळोखे यांनी दिली.
ई वॉर्ड, कावळा नाका, राजेश मोटर्स शेजारी दत्तात्रय विठोबा आत्याळकर यांनी चहा नाष्ट्याची केबीन व पत्र्याचेशेड उभे केले होते. महापालिकेने यापूर्वी दोनवेळा येथ कारवाई करुन केबिन जप्त केली होती. परंतु मागील वर्षी मनपाविरुद्ध संबधित अतिक्रमणधारक दत्तात्रय आत्याळकर यांनी न्यायालयात दावा दाखल केला. याचा निकाल नुकताच महानगरपालिकेच्या बाजूने लागला. यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी संबधित केबीन जप्त केली.
अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उप-शहर अभियंता रमेश कांबळे व अधीक्षक अतिक्रमण विभाग विलास साळोखे, रवि कांबळे, सज्जन नागलोत यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्त होता.
कारवाई शहरात सुरूच राहणार
कोल्हापूर शहरामध्ये अनाधिकृतपणे व वाहतुकीस अडथळा करणारे व्यवसायिक, फेरीवाले, हातगाडीवाले यांच्यावर अतिक्रमण विभागामार्फत कारवाई केली जाणार असल्याने संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने केली आहे.