हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्रावरील नदी परिसराची स्वच्छता
बेळगावमधील प्रयास अभियान संस्थेच्यावतीने स्वच्छता अभियान
वार्ताहर /कणकुंबी
हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्रावरील मलप्रभा नदी परिसर स्वच्छ करण्याच्या हेतूने बेळगावमधील प्रयास अभियान संस्थेच्या वतीने रविवारी(दि. 25 रोजी) स्वच्छता अभियान राबविण्यात आले. देवस्थानवर येणाऱ्या भाविकांकडून केरकचरा टाकून परिसर गलिच्छ केला जातो. अनेक संघ संस्थांकडून वेळोवेळी देवस्थान परिसराची स्वच्छता केली जाते. प्रयास अभियान संस्थेच्या वतीने देखील गेल्या अनेक दिवसांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. निसर्गाला व नदीला भारतीय नागरिक आई मानतात. आपल्या आईचे पावित्र्य राखण्याच्या भावनेतून प्रयास संस्थेच्या मंडळींनी जानेवारी 2024 पासून दर रविवारी सकाळी 6 ते 10 या वेळेत बेळगावच्या आजूबाजूच्या परिसरातील नदी परिसराची स्वच्छता करण्याचे काम सुरू केले आहे. यानुसार आतापर्यंत असोगा व हब्बनहट्टी नदी परिसर स्वच्छ करण्याचे कार्य सुरू केले आहे. या कार्यामध्ये अनेक लोकांचे सहकार्य इच्छित आहे. जर कुणाला आवड असेल तर त्यांनी अनिल कुलकर्णी 9986983947, अक्षय कुलकर्णी 9620683081 यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. हब्बनहट्टी देवस्थानवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमध्ये प्रयास संस्थेच्या कार्यकर्त्या सपना पाटील, अनिता कुलकर्णी, पूजा जोशी, तसेच अमर जोशी, अनंत कुलकर्णी, विनायक देशपांडे, विनय बेटगेरी, वाणी जोशी, नंदा गरगट्टे व अन्य सदस्य सहभागी झाले होते.