Satara : मोरगिरी गावात मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाअंतर्गत स्वच्छता व विकास उपक्रम यशस्वी
मोरगिरी गावातील सामाजिक वाढली बांधिलकी
पाटण : मोरगिरी येथे रविवारचे चार तास गावासाठी या उपक्रमांतर्गत संपूर्ण गावातील स्वच्छता करून नाले, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात आले. राज्यात सध्या सुरू असलेले मुख्यमंत्री पंचायतराज अभियान यामध्ये गावागावात उत्साह दिसून येत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी चांगलीच कंबर कसली असून शासनाच्या निकषाप्रमाणे मोठ्या उत्साहात काम सुरू आहे.
यामध्ये वृक्षलागवड, गावातील स्वच्छता, शाळा व्यवस्थापन, अंगणवाडी अशी विविध कामे हाती घेतली आहेत. गावातील नागरिकांचा मोठा सहभाग असून गावातील विविध कामे मार्गी लावली जात आहेत. गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक हे प्रत्येक उपक्रमात सहभागी होऊन श्रमदान करुन मोठे योगदान देत आहेत. या उपक्रमामुळे गावात अमुलाग्र बदल दिसत असून यामुळे सार्वजनिक कामे करत असताना सर्वसामान्य लोकांची ओढ निर्माण झाली आहे.
मोरगिरी गावात गेल्या तीन वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांनी निवडून दिलेले सर्वसामान्य पदाधिकारी, युवा वर्ग असून गावासाठी झोकून काम करत आहेत. यातच त्यांना मुख्यमंत्री पंचायतराज अभियान हे चांगले व्यासपीठ मिळाले आहे. गत तीन वर्षात केलेली कामे व सध्या सुरू असलेली कामे यांना नक्कीच न्याय मिळेल, अशी गावातील स्थिती तयार केली आहे. गावातील ग्रामपंचायत कार्यालय, सरकारी दवाखाना, पशुवैद्यकीय दवाखाना, शाळा दुरुस्ती, स्मशानभूमी सुशोभीकरण, फिल्टर यासारखी कामे हाती घेतली आहेत.