महापौर-उपमहापौर कक्षांची साफसफाई
बेळगाव : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. यामुळे महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर यांच्या कक्षाला कुलूप लावण्यात आले आहेत. त्यामुळे त्याठिकाणी स्वच्छताही करण्यात आली नव्हती. मात्र मंगळवारी हे दोन्ही कक्ष उघडून त्या ठिकाणची स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापौर, उपमहापौर यांच्या कक्षाला कुलूप लावण्यात आला. याचबरोबर त्यांची सरकारी वाहनेही जमा करण्यात आली आहेत. विरोधी व सत्ताधारी गटाच्या नेत्याच्याही कक्षाला कुलूप लावण्यात आला आहे. त्यामुळे नगरसेवक महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर त्यांना बसण्यासाठीही जागा नसल्याची तक्रार केली होती. तरी देखील त्यांना अजूनही निवडणूक निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. मंगळवारी महापौर, उपमहापौर कक्षाची साफसफाई करण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा ते कक्ष बंद करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी होणार आहे. त्यानंतर आचारसंहिता संपणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर हे कक्ष खुले जाणार असल्याचे सांगण्यात आले.