सौंदत्ती यात्रेपूर्वी होणार जोगणभावी कुंडाची स्वच्छता;सतेज पाटील यांनी वेधले होते कर्नाटक मंत्र्यांचे लक्ष
स्वच्छता व पार्किंग नियोजनचे बेळगाव प्रशासनाची ग्वाही
कोल्हापूर प्रतिनिधी
सौंदत्ती येथील रेणुका मंदिर जवळील जोगणभावी कुंडाची तातडीने स्वच्छता केली जाईल, तसेच भक्तांना स्वच्छ पाणी आणि योग्य पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिले जाईल अशी ग्वाही कर्नाटक प्रशासनाने दिली आहे. आमदार सतेज पाटील यांनी याबाबत कर्नाटकचे कायदामंत्री एच. के. पाटील यांचे या प्रश्नावर लक्ष वेधल्यानंतर बेळगाव प्रशासनाने कुंडाच्या स्वच्छतेबाबत तातडीने पावली उचलली आहेत.
कोल्हापुरातील सुमारे अडीच लाख रेणुका भक्त सौंदत्ती यात्रेसाठी जातात. या भाविकांकडून जोगणभावी कुंडात तीर्थाची आंघोळ आणि लिंब नेसण्याचा विधी केला जातो. मात्र, या कुंडातील पाणी अत्यंत दूषित व परिसर अस्वच्छ असून तो स्वच्छ न केल्यास लिंब नेसण्याच्या विधीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेतर्फे देण्यात आला होता.
कोल्हापूरमधील रेणुका भक्तांनी मांडलेल्या या प्रश्नांची महाराष्ट्र विधान परिषद काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गांभीर्याने दखल घेत कर्नाटकचे कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच के पाटील यांना 7 नोव्हेंबर रोजी पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधले.
जोगणभावी कुंडातील पाणी दूषित आणि दुर्गंधीयुक्त असते. जुने कपडे, प्लॅस्टिक पिशव्यांनी हा परिसर अस्वच्छ असतो. यात्रेसाठी जाणाऱ्या कोल्हापुरातील भाविकांना ते त्रासदायक ठरत आहे. २४ ते २७ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या यात्रेपुर्वी कुंडाची स्वच्छता करावी. या स्थळाचे पावित्र्य जतन करणे आवश्यक आहे. त्यामुळे या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी विनंती आमदार सतेज पाटील यांनी या पत्राद्वारे केली होती.
आमदार पाटील यांच्या पत्राची तातडीने दखल घेत मंत्री एच के पाटील यांनी बेळगाव प्रशासनाला याबाबत तातडीने कार्यवाहीचे निषेध निर्देश दिले होते. त्यानुसार यात्रेपूर्वी अधिकचे मनुष्यबळ या ठिकाणी लावून कुंडाची स्वच्छता केली जाईल. तसेच भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविले जाईल व पार्किंगसाठीही योग्य नियोजन केले जाईल अशी ग्वाही बेळगावचे उपायुक्त नितेश के.पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांना पत्राद्वारे दिली आहे.