लेंडी-बळ्ळारी नाल्यांची स्वच्छता करा
बेळगाव शेतकरी संघटनेची मागणी : राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण-जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
बेळगाव : लेंडी नाला व बळ्ळारी नाल्याची स्वच्छता करून शेतीला अनुकूल करून द्यावे, अशी मागणी बेळगाव शेतकरी संघटनेने केली आहे. लेंडी व बळ्ळारी नाल्यांच्या परिसरात पिकाऊ शेतवडी मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येकवर्षी पावसाळ्यात नाल्याचे पाणी शिवारात शिरून पिकांची मोठ्या प्रमाणात हानी होते. नाल्यांची उंची वाढवावी, दोन्ही नाल्यांची वेळोवेळी स्वच्छता करावी, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाकडे अनेकदा करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे नाला परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे लेंडीनाल्याचे पाणी शिवारात शिरून पिकांचे नुकसान झाले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
दोन्ही नाले कचऱ्याने तुंबलेले असल्याने सांडपाण्याचा व पावसाच्या पाण्याचाही व्यवस्थित निचरा होत नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन शेतकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तुंबून राहिलेल्या पाण्यामुळे दुर्गंधीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. राष्ट्रीय महामार्ग-4 शेजारील ड्रेनेजची पाईपलाईन फुटली असल्यामुळे त्यामध्ये पावसाचे पाणी साचते. गेल्या 24 वर्षांपासून ही समस्या उद्भवत आहे. किल्ला तलावातील पाणीसुद्धा राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या दिशेने वाहून नाल्यात मिसळत आहे. आजूबाजूच्या शिवारात पाणी शिरून तळ्यांचे स्वरूप येते. 2000 मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन भुयारी मार्गाची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. पण प्राधिकरण असो किंवा जिल्हा प्रशासनाने मागणीची दखल घेतली नाही. याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.
लेंडी व बळ्ळारी नाला परिसरातील शेतीला मागील 24 वर्षांपासून समस्या येत आहेत. येळ्ळूर रोड ते मुचंडीजवळील बळ्ळारी नाला हा दोन्ही बाजूंनी 1 कि. मी. पर्यंत नादुरुस्त असल्याने नाल्यातील पाणी शिवारात शिरून सुमारे पाच हजार एकर शेत जमिनीतील पिकांना धोका पोहोचत आहे, अशा तक्रारी निवेदनातून मांडण्यात आल्या आहेत. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, पाटबंधारे मंत्री, जिल्हा पालकमंत्री, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, जिल्हाधिकारी, तहसीलदार बेळगाव आदींना पाठविण्यात आल्या आहेत. नगरसेवक शिवाजी मंडोळकर, शेतकरी नेते नारायण सावंत व अन्य शेतकऱ्यांच्यावतीने हे निवेदन देण्यात आले.