बळ्ळारी-लेंडी नाल्याची तातडीने स्वच्छता करा
बेळगाव शेतकरी संघटनेच्यावतीने महापौरांना निवेदन : प्रत्यक्ष पाहणी करून कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी
बेळगाव : बळ्ळारी नाला व लेंडी नाल्याची स्वच्छता करून त्यातील गाळ तातडीने काढावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन बेळगाव शेतकरी संघटनेच्यावतीने महानगरपालिकेच्या आयुक्त बी. शुभा व महापौर सविता कांबळे यांना देण्यात आले. संघटनेच्या सदस्यांनी गुरुवारी सकाळी हे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, बळ्ळारी नाल्याच्या समस्येमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. या नाल्याची सफाई न झाल्याने नाल्यामध्ये कचरा व घाण अडकून साचली आहे. या नाल्याचा विस्तार बेळगाव शहर, रेल्वेलाईन ते मुचंडी गावापर्यंत तसेच आजुबाजूच्या गावापर्यंत विस्तारलेला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे हेक्टरी एक लाखाचे नुकसान दरवर्षी होत आहे. एकदाही या नाल्याची सफाई झाली नाही व गाळही न उपसता काम झाल्याची नेंद करून बिले लावून पैसे उकळले जातात. नाल्याची सफाई न झाल्याने चोहोबाजूंनी पाणी साचून राहते. ते शेतीत शिरते, त्यामुळे शेतीचे नुकसान तर होतेच पण राष्ट्रीय महामार्गसुद्धा बंद होतो. मुचंडी गावानजीक नाल्यामध्ये ड्रेनेज पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासन किंवा मनपा याप्रकरणी गंभीरपणे लक्ष घालत नसल्याने गतवर्षी शेतकरी संघटना व इतरांनी लेंडी नाल्याची डागडुजी करून बांधकाम करून घेतले पण वळीव आणि ढगफुटी सदृश पावसामुळे हे बांधकाम फुटले व संपूर्ण पाणी शिवारात शिरले. सध्या हे घाण पाणी 300 एकर शेतामध्ये वाहत आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. त्यांना शेतात रोपेसुद्धा लावता आली नाहीत. याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. दरवर्षी शेतकरी संघटना याविषयी आवाज उठवून निवेदन देते. परंतु याबद्दल कोणालाच गांभीर्य राहिलेले नाही. सततच्या होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी शेती न करणे पसंत केले आहे. परिस्थिती अधिक गंभीर होण्यापूर्वी जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांनी बळ्ळारी नाला व लेंडी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करावी व या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढावा व शेतकऱ्यांचे होणारे त्रास थांबवावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
उन्हाळ्यात लेंडी नाल्याचे काम पूर्ण करावे
सध्या सुगी सुरू आहे. नाल्याचे पाणी शिवारात आल्यास कामात व्यत्यय निर्माण होईल. त्यामुळे सध्या बांधांचे काम हाती घ्यावे जेणेकरून शिवारात पाणी येणे बंद होईल व उन्हाळ्यात लेंडी नाल्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी केली. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पाटबंधारे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री, पालकमंत्री, महिला व बाल कल्याण मंत्री, तहसीलदार, उत्तरचे आमदार यांना पाठविल्या आहेत.