ईश्वरप्पांना क्लीनचिट
कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरण : उडुपी जिल्हा पोलीस प्रमुखांकडून न्यायालयात बी रिपोर्ट सादर
प्रतिनिधी /बेंगळूर
हिंडलग्यातील कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाचा तपास करणारे उडुपी जिल्हा पोलीस प्रमुख विष्णूवर्धन यांनी बेंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात बी. रिपोर्ट सादर केला आहे. कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात ईश्वरप्पांविरुद्ध कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. ईश्वरप्पा आणि संतोष पाटील यांची समोरासमोर भेटच झाली नव्हती, असेही बी रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
बेळगाव जिल्हय़ातील हिंडलगा येथील कंत्राटदार संतोष पाटील यांनी 12 एप्रिल रोजी उडुपीतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या मित्रांना मोबाईलवरून संदेश पाठविला होता. त्यामध्ये आपल्या मृत्यूला ईश्वरप्पाच जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले होते. ईश्वरप्पा यांनी आपल्या कंत्राटातील 40 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप संतोष पाटील यांनी केला होता. या प्रकरणानंतर ईश्वरप्पा यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
या प्रकरणाचा तपास करणाऱया उडुपी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या पथकाने बेंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात बी रिपोर्ट सादर केला आहे. ईश्वरप्पा यांनी संतोष यांच्याकडे पैसे मागितल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. उभयतांमधील व्हॉटस्अप चॅट, व्हिडिओसह कोणतेही तांत्रिक पुरावे सापडलेले नाहीत. कार्यकर्ते ज्याप्रमाणे येऊन जात होते, त्याप्रमाणे संतोष पाटील येऊन जात होते, असेही पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अलीकडेच संतोष पाटील यांच्या पत्नीने राज्यपालांना पत्र पाठवून ईश्वरप्पा प्रभारी असल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली होती. दरम्यान बुधवारी न्यायालयात पोलिसांकडून बी रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. याविषयी ईश्वरप्पा यांनी प्रतिक्रिया देताना आपण कोणतीही चूक केलेली नाही, अशी शपथ कुलदेवता चौडेश्वरीकडे केली होती. देवीच्या आशीर्वादानेच आपण आपल्याला या प्रकरणात क्लीनचिट मिळाली आहे. आरोपमुक्त होण्याचा विश्वास आपल्याला होता, असे सांगितले आहे.