स्वरमल्हार फाऊंडेशनतर्फे शास्त्रीय संगीत बैठक
बेळगाव : गानविदुषी कै. डॉ. शामला गोविंद भावे, बेंगळूर यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वरमल्हार फाऊंडेशन, बेळगाव आणि सरस्वती संगीत विद्यालय बेंगळूर यांच्या संयुक्त विद्यमाने 16 मार्च रोजी अपॅडमी ऑफ म्युझिकच्या ‘पं रामभाऊ विजापुरे स्वर मंदिर’ सभागृहात शास्त्रीय संगीताची बैठक झाली. यामध्ये स्मृती भट, बेंगळूर यांनी राग पटदीपमध्ये झपताल व त्रितालमधील बंदीशी सादर केल्या. त्यानंतर हिंदी भजन व पुरंदरदास भजन आणि श्रीदेवी स्तुती सादर करून आपले गायन केले. दुसरे पुष्प गुंफताना त्रिगुण पुजारी, इचलकरंजी यांनी संवादिनी वादन सादर केले. त्यांनी राग मधुवंती तयारीने वाजवून श्रोत्यांची दाद मिळविली. ‘आपदा राज्यपदा भयदा’ या नाट्यागीताने आपले वादन केले.
बैठकीचे तिसरे पुष्प सुलक्षणा देसाई व ऐश्वर्या निरंजन यांनी आपल्या सहगायनाने गुंफले. त्यांनी राग बागेश्रीमध्ये बडाख्याल आणि छोटाख्याल अतिशय तयारीने सादर केला. त्यानंतर विदुषी शामलाताई भावे यांनी संगीत दिलेल्या ‘मदन गोपाल हमारे रामा’ या भजनाने आपले गायन संपविले. सर्व कलाकारांना वागीश भट, बेंगळूर, सारंग कुलकर्णी, अंगद देसाई आणि त्रिगुण पुजारी या कलाकारांची उत्कृष्ट साथसंगत लाभली. रोहिणी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. त्यांनी गानविदुषी शामलाताईंच्याप्रति असलेला आपला आदरभाव व्यक्त करताना ताईंच्या संगीत योगदानाची माहिती तसेच काही आठवणी सांगितल्या.