For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वर मल्हार फाउंडेशनतर्फे शास्त्रीय संगीताची मैफल

11:11 AM Sep 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्वर मल्हार फाउंडेशनतर्फे शास्त्रीय संगीताची मैफल
Advertisement

बेळगाव : स्वर मल्हार फाउंडेशनतर्फे शास्त्रीय संगीताची मैफल रविवारी दोन सत्रात पार पडली. गायन आणि वादनाचे सादरीकरण हे या विशेष बैठकीचे वैशिष्ट्या असते. प्रत्येकी दोन तास या प्रमाणे चार कलाकारांनी पूर्ण कौशल्याने आपली कला सादर केली. प्रारंभी कित्तूर ग्रामवासी रजत कुलकर्णी याने ‘मियां की तोडी’ या प्रभात कालीन रागाने आपल्या गायनाची सुऊवात केली. त्यानंतर ‘अहिर भैरव’ राग सादर केला. दोन्ही रागांमध्ये विलंबित बडाख्याल आणि छोटा ख्याल त्याने सादर केले. ‘मेघ मल्हार’ रागातील मध्य लय त्रिताल बंदिशीने आपले गायन संपविले. जन्मजात लाभलेल्या मुलायम आवाजाने, तसेच किराणा घराण्याच्या वैशिष्ट्यासह नाजूक हरकती आणि संथ आलापी आणि तान क्रियेने त्याने रसिकांना तृप्त केले. त्यांना पुण्याचे प्रसिद्ध तबला वादक श्रीकांत भावे आणि सारंग कुलकर्णी यांनी सुसंगत साथ संगत केली.

Advertisement

त्यानंतर बेळगावचे योगेश रामदास यांनी बैठकीचे दुसरे सत्र ‘देसी रागा’ने सुरू केले. त्यानंतर ‘मधमाध सारंग’ आणि खास फर्माईश केलेली ‘हिंडोल गावत’ ही रागमाला व स्वरचित ठुमरी अतिशय तयारीने, प्रगल्भतेने सादर केली. त्यांनी आपल्या भावपूर्ण गायनाने रसिकांची दाद मिळविली. त्यांना तबल्यावर अंगद देसाई आणि संवादिनीवर त्रिगुण पुजारी यांची तितकीच रंगतदार साथसंगत लाभली. दुपारच्या सत्रात बेंगळूरवासी कृष्णेंद्र समर्थ या आग्रा घराण्याची तालीम घेत असलेल्या युवा कलाकाराने ‘गौड मल्हार’ या वर्षा कालीन रागाने आपल्या गायनाला सुऊवात केली. त्यानंतर पूर्वी रागात आग्रा घराण्याच्या वैशिष्ट्यापूर्ण आलापचारी करून एक बंदिश सादर केली. त्यानंतर देस रागात उपशास्त्रीय प्रकार आणि तराना गाऊन गायन समाप्ती केली. त्यांना त्रिगुण पुजारी आणि अंगद देसाई यांनी उत्तम साथसंगत केली.

बैठकीचे चौथे व अंतिम सत्र गुंफले पुणे वासी स्वानंदी सडोलीकर यांनी. त्यांनी राग ‘ललितागौरी’ हा जोड राग अतिशय तयारीने सादर केला. त्यानंतर ‘छायानट’ रागातील व झुमरा तालात निबद्ध ख्याल ‘करत हो’ आणि छोटा ख्याल प्रस्तुत केला. त्यानंतर अजून एक जोड राग ‘शहाणा कानडा’ गाऊन शेवटी ‘काफी’ रागातील ‘ओ मियां जानेवाले’ हा प्रसिद्ध टप्पा विशिष्ट शैलीत सादर केला. त्यांची तालावर आणि स्वरावरची हुकूमत लाजवाब होती. ग्वाल्हेर घराण्याची मजबूत तालीम त्यांच्या गायनात पुरेपूर दिसून आली. त्यांना तितकीच समर्थ साथ श्रीकांत भावे आणि सारंग कुलकर्णी यांनी दिली. सर्व कलाकारांना तानपुरा साथ तन्मयी सराफ, पूर्वी राजपुरोहित, पावनी ऐरसंग आणि ऐश्वर्या निरंजन यांनी केली. बैठकीच्या प्रारंभी श्रीकांत भावे, पद्माकर, प्रभाकर शहापूरकर, रजत कुलकर्णी यांनी दीपप्रज्वलन केले. ऐश्वर्या निरंजन यांनी सूत्रसंचालन केले. रोहिणी कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.