जागेच्या वादातून बकरी मंडईत धुमश्चक्री
दोन गटात हाणामारी, दगडफेक : पाचहून अधिक जखमी: दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू : परिसरात बंदोबस्त कायम
बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून गणाचारी गल्लीतील बकरी मंडईच्या जागेतून धुमसत असलेला जागेचा वाद मंगळवारी रात्री उफाळून आला. रात्री 8 च्या दरम्यान दोन गटात जोरदार धुमश्चक्री झाली. यावेळी बिअरच्या बॉटल्स आणि दगडफेक करण्यात आल्याने काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यामध्ये दोन्ही गटांतील पाचहून अधिक जण जखमी झाले असून दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खडेबाजार पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली असून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर ही घटना घडली नसती. पोलिसांचा दुर्लक्षपणा या घटनेस कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. सुरेश लाटे (वय 28), राजू तळवार (वय 30, दोघेही रा. गणाचारी गल्ली) अशी एका गटातील जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बकरी मंडईतील जागेचे मोजमाप
त्यानुसार मंगळवारी दुपारी महापालिका आणि सीटी सर्व्हेचे अधिकारी बकरी मंडईतील जागेचे मोजमाप करून हद्द निश्चित करण्यासाठी आले होते. सायंकाळपर्यंत अधिकाऱ्यांनी जागेचे मोजमाप करून हद्द निश्चित केली. मात्र दुपारपासूनच दोन्ही गटातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने त्याठिकाणी जमले होते. अधिकारी मोजमाप उरकून निघून गेले तरीदेखील दोन्ही गटातील नागरिक मात्र बकरी मंडईत थांबून होते. जागेच्या वादातून दोन गटातील तरुणांमध्ये बाचाबाची झाली. वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी काठी, बियर बॉटल्स, दगड फेकण्यासह लाथा बुक्क्यांनी मारहाण झाल्याने दोन गटातील पाचहून अधिक जण जखमी झाले. यापैकी गणाचारी गल्लीतील सुदेश आणि राजू हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस उपायुक्तांची घटनास्थळी भेट
बकरी मंडईत जागेच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याने तणावाची घटना घडल्याची माहिती खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. काही वेळानंतर कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बीरदेव मंदिर परिसराची पाहणी करण्यासह उपस्थितांकडून माहिती जाणून घेतली.
पोलीस वाहनावर हल्ला
दोन गटात धुमश्चक्री उडाल्यानंतर एकच धावपळ उडाली. साध्या वेशातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. तसेच दुसऱ्या गटातील एका तऊणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनात कोंबले. त्यानंतर तऊणाला पोलीस स्थानकाकडे आणले जात होते. मात्र दुसऱ्या गटातील संतप्त जमावाने पोलीस वाहन रस्त्यात अडविले. त्याचबरोबर लाठ्या- काठ्या घेऊन पोलीस वाहनावर हल्ला चढविला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत जमावाला बाजूला करत वाहन पोलीस स्थानकापर्यंत आणले. पण यामध्ये पोलीस वाहनाचे काही प्रमाणात नुकसान झाले.