काँग्रेस-भाजप आमदारांमध्ये खडाजंगी
वसती शाळांमधील घोषवाक्य बदलल्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ
बेंगळूर : समाज कल्याण खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या वसती शाळांच्या प्रवेशद्वारावर असणारे घोषवाक्य बदलण्यात आल्याने विरोधी पक्षाने राज्य सरकारला धारेवर धरले, तर सत्ताधारी काँग्रेसने आपल्या भूमिकेचे समर्थन केले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. परिणामी सभागृहात गदारोळ माजला. सभागृहाबाहेरही भाजप नेत्यांनी सरकारच्या भूमिकेला आक्षेप घेतला. यापूर्वी वसती शाळांच्या प्रवेशद्वारावर ‘हे ज्ञानमंदिर आहे, हात जोडून आत ये’ असे राष्ट्रकवी कुवेंपू यांचे कन्नडमधील घोषवाक्य लिहिले होते. त्यात बदल करून समाजकल्याण खात्याने ‘हे ज्ञानमंदिर आहे, धाडसाने प्रश्न विचारा’, असा बदल केला. यासंबंधीच्या आदेशावरून तर्कवितर्क व्यक्त झाले आहेत. सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.
विधानसभेत शून्य प्रहर वेळेत भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी मुद्दा उपस्थित करताना राज्यातील वसती शाळांच्या प्रवेशद्वारावर घोषवाक्य बदलल्याचे वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले आहे. या सरकारमध्ये काय होत आहे? असा प्रश्न उपस्थित केला. यापूर्वी असणारे घोषवाक्य बदलण्यात आल्यासंबंधीचे समाजकल्याण खात्याच्या मुख्य सचिवांचे व्हॉट्सअॅप संदेश सर्वत्र व्हायरल झाले आहे. सरकारने घोषवाक्य बदलून राज्य सरकारन कुवेंपू यांचा अवमान करत आहे, असा आरोप केला. तेव्हा विरोधी पक्षनेते आर. अशोक, भाजप आमदार डॉ. अश्वत्थ नारायण आणि भरत शेट्टी यांनी घोषवाक्य बदलण्याची गरजच काय होती, असा प्रश्न उपस्थित केला. यापूर्वी वसती शाळांमध्ये धार्मिक सण साजरे करू नयेत, असा आदेश देण्यात आला. नंतर तो मागेही घेण्यात आला, असा मुद्दाही भाजप आमदारांनी उपस्थित केला.
त्यावर सरकारच्यावतीने उत्तर देताना मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी, भाजपने प्रश्न मांडला आहे. त्यावर सरकारकडून वास्तविक उत्तर देण्यात येईल. याविषयी अधिक बोलण्याची मुभा नाही, असे सांगितले. यावर भाजपचे डॉ, अश्वत्थ नारायण संतप्त झाले. मी घोषवाक्य बदलण्याबद्दल विचारणा केली आहे. मंत्री महोदय आम्ही जास्त बोलत असल्याचा समज करून घेत आहेत. त्यांनी अशा प्रकारचे उत्तर देणे योग्य नाही, असा टोला लगावला. त्यामुळे महसूलमंत्री कृष्णभैरेगौडा संतप्त झाले. कुवेंपू यांचा अवमान झाला, असा आरोप करत आहात. परंतु, तुम्ही कुवेंपूंचा धडाच शालेय पाठ्यापुस्तकातून वगळला आहात. आता आम्हाला शहाणपण सुचविण्यात येत आहात का?, असा टोला हाणला. मंत्री कृष्णभैरेगौडा यांच्या टिकेमुळे विरोधी पक्षातील आमदार उठून उभे राहिले. त्यांनी सत्ताधारी पक्षावर कडाडून टीकाप्रहार केला. त्यामुळे सभागृहात गोंधळ माजला. तेव्हा सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी हस्तक्षेप करून भाजप आमदारांना उद्देशून तुम्ही प्रश्न मांडला आहात, त्यावर सरकार उत्तर देईल. आताच चर्चा, वाद-विवाद थांबविला तर उचित ठरेल, असे सांगितले.
मुख्य सचिवां कारवाई करा : आर. अशोक
तेव्हा विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी उभे राहून सरकारने उत्तर द्यावे, आम्ही नाही म्हणणार नाही. मात्र, समाजकल्याण खात्याच्या मुख्य सचिवांनी घोषवाक्य बदलले आहे. त्यांना अधिकार कोणी दिला, कोणाला विचारून त्यांनी हा बदल केला, असा प्रश्न विचारून समाजकल्याण खात्याच्या मुख्य सचिवांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर सरकारकडून उद्या (मंगळवारी) उत्तर दिले जाईल, असे सांगून प्रश्नोत्तर चर्चा सुरू केली. त्यानंतर सभागृहात शांतता पसरली.
विधानपरिषदेत कामकाज तहकूब
विधानपरिषदेत भाजपचे सदस्य एन. रविकुमार यांनी घोषवाक्य बदलाचा मुद्दा उपस्थित केला. सभागृह नेते बोसराजू यांनी संबंधित मंत्र्यांकडून उत्तर दिले जाईल, असे सांगितले. मात्र, त्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी सरकारवर टिकेची झोड उठविली. सरकारने उत्तर दिलेच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली. तेव्हा सभापतींच्या आसनावर असलेल्या उपसभापती तेजस्विनी रमेश यांनी शून्य प्रहर वेळेत या विषयावर चर्चा करता येणार नाही. नंतर चर्चेला मुभा दिली जाईल, असे सांगितले. त्यामुळे भाजपचे सदस्य संतप्त झाले. त्यांनी सभापतींच्या आसनासमोर जाऊन घोषणाबाजी केली. यावेळी सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी भाजपच्या सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. सभागृहात गदारोळ माजला. त्यामुळे कामकाज पुढे ढकलण्यात आले.