ऑस्ट्रेलियन महिला संघाचा विजय
न्यूझीलंडचा 65 धावांनी पराभव, सुदरलॅंड ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / वेलिंग्टन
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने यजमान न्यूझीलंडचा डकवर्थ लेव्हीस नियमाच्या आधारे 65 धावांनी पराभव करुन 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सुदरलँडला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. सुदरलँडने या सामन्यात 81 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारांसह नाबाद 105 धावांची खेळी केली. या विजयामुळे ऑस्ट्रेलियन महिला संघ आता आयसीसीच्या महिलांच्या चॅम्पियनशीप स्पर्धेत तिसऱ्यांदा जेतेपद मिळविण्याच्या समीप पोहोचला आहे.
या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 7 बाद 291 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंडच्या डावात पावसाचा अडथळा आल्याने त्यांना पंचांनी 30.1 षटकात वियासाठी 188 धावांचे नवे उद्दिष्ठ दिले. त्यानंतर न्यूझीलंडने 30.1 षटकात 5 बाद 122 धावा जमविल्याने त्यांना हा सामना 65 धावांनी गमवावा लागला.
ऑस्ट्रेलियाच्या डावात सुदरलँडने नाबाद 105 धावांची खेळी केली. कर्णधार अॅलिसा हिलीने 32 चेंडूत 7 चौकारांसह 34, लीचफिल्डने 39 चेंडूत 3 चौकारांसह 25, इलीसी पेरीने 42 चेंडूत 4 चौकारांसह 29, मुनीने 1 चौकारांसह 14, गार्डनरने 2 चौकारांसह 19, ताहीला मॅकग्राने 30 चेंडूत 6 चौकारांसह 34 तर गॅरेथने 1 चौकारांसह नाबाद 11 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 2 षटकार आणि 35 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे मॉली पेनफोल्डने 42 धावांत 4, कार्सनने 65 धावांत 2 तर मेअरने 56 धावांत 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावात जेम्सने 31 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 27, अॅमेलिया केरने 55 चेंडूत 3 चौकारांसह 38, कर्णधार डिव्हाईनने 3 चौकारांसह 15, हॅलिडेने 7 तर मॅडी ग्रीनने 41 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 26 धावा केल्या. बेटस् 4 धावांवर बाद झाली. न्यूझीलंडच्या डावात 1 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे गॅरेथने 17 धावांत 2 तर पेरी आणि गार्डनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या मालिकेतील वेलिंग्टनचा पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. सुदरलँडचे वनडेमधील हे सलग दुसरे शतक आहे. यापूर्वी तिने भारताविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात शतक झळकविले होते. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 23 डिसेंबरला खेळविला जाणार आहे.
आयसीसीच्या महिलांच्या चॅम्पियनशीप स्पर्धेत आता विद्यमान विजेता आणि विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा सलाग तिसऱ्यांदा जेतेपदाच्या समीप पोहोचला आहे. आयसीसी महिलांच्या चॅम्पियनशीप स्पर्धेच्या गुणत्तक्त्यात ऑस्ट्रेलियाचा संघ 37 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. भारताने 25 गुण मिळविले आहेत. आता ऑस्ट्रेलियन महिला संघाला गाठण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाला उर्वरित म्हणजे सर्व सहा सामने जिंकावे लागले. भारताचे तीन सामने विंडीज बरोबर तर तीन सामने आयर्लंडबरोबर होणार आहे.
संक्षिप्त धावफलक: ऑस्ट्रेलिया 50 षटकात 7 बाद 291 (सुदरलँड नाबाद 105, हिली 34, लीचफिल्ड 25, पेरी 29, मुनी 14, मॅकग्रा 34, गार्डनर 19, गॅरेथ नाबाद 11, अवांतर 12, पेनफोल्ड 4-42, कार्सन 2-65, मेअर 1-56), न्यूझीलंड (30.1 षटकात 188 धावांचे उद्दिष्ठ), 30.1 षटकात 5 बाद 122 (जेम्स 27, अॅमेलिया केर 38, डिव्हाईन 15, ग्रिन नाबाद 26, गॅरेथ 2-17, पेरी 1-15, गार्डनर 1-15)