‘हॉकी इंडिया’मध्ये दुफळीचे दावे फेटाळले
अध्यक्ष दिलीप तिर्की, सरचिटणीस भोलानाथ सिंग यांचे संयुक्त निवेदन, एलेना नॉर्मन यांचे दावे अयोग्य असल्याचे स्पष्टीकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की आणि सरचिटणीस भोलानाथ सिंग यांनी बुधवारी मावळत्या सीईओ एलेना नॉर्मन यांनी त्यांच्यातील मतभेदांबाबत जे विधान केले होते ते फेटाळून लावले आहे. आमच्यात एकजूट आहे आणि खेळाच्या सर्वोत्तम हितासाठी आम्ही काम करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
नॉर्मन यांनी मंगळवारी राजीनामा देऊन एका मुलाखतीत संघटनेत दुफळी असल्याचा आरोप केला होते. सदर 49 वर्षीय ऑस्ट्रेलियन महिलेने तिर्की आणि सिंग यांच्यात भांडण झाले असल्याचे संकेत दिले होते आणि कामाच्या बाबतीत कठीण वातावरणाची कैफियत देखील मांडली होती. त्यानंतर एका संयुक्त निवेदनात तिर्की आणि सिंग यांनी नॉर्मन यांचे दावे फेटाळले आहेत.
अलीकडेच बाहेर पडणाऱ्या अधिकाऱ्यांची विधाने प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली असून संघटनेत फूट पडली असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे. हे योग्य नाही. आम्ही एकजुटीने काम करत आहोत आणि नेहमीप्रमाणे खेळाच्या हितासाठी एकत्र आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हॉकी इंडिया ही एक स्वायत्त आणि व्यावसायिक संस्था आहे, जी भारतीय हॉकीच्या विकासासाठी समर्पित आहे. एक संघटना म्हणून आमचे मुख्य उद्दिष्ट हॉकी व आमच्या खेळाडूंचे कल्याण आणि प्रगती हेच राहिले आहे आणि राहील, असे तिर्की व सिंग यांनी म्हटले आहे.
भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षिका जेनेके शॉपमन यांनी कामाच्या कठीण वातावरणाची तक्रार करत राजीनामा दिल्यानंतर नॉर्मन यांनी दिलेला राजीनामा हा ‘हॉकी इंडिया’ला बसलेला दुसरा धक्का होता. शॉपमन यांनी महिला हॉकीला सावत्र आईसारखी वागणूक दिल्याचा आरोप संघटनेवर केला होता. तिर्की आणि सिंग यांनी हॉकी इंडियाने नेहमीच सर्व संघ आणि खेळाडूंना समान वागणूक दिली असल्याचे म्हटले आहे आणि संघटनेत समानतेचे वातावरण निर्माण केले असल्याचा दावाही केला आहे.
तिर्की व सिंग यांनी त्यांचे लक्ष आता ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू न शकलेल्या महिला संघाची पुनर्बांधणी करण्यावर आणि या वर्षी पॅरिसमधील ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार असलेल्या पुऊषांच्या संघाला मदत करण्यावर असल्याचे स्पष्ट केले आहे. नॉर्मन यांनी 2011 मध्ये महासंघाच्या पहिल्या सीईओ म्हणून कार्यकाळ सुरू केला होता. त्यावेळी नरिंदर बत्रा प्रमुखपदी होते. राजीनामा दिल्यानंतर बोलताना नॉर्मन यांनी हॉकी इंडियामधील दुहीमुळे जबाबदारी पेलणे कायम ठेवणे त्यांच्यासाठी कठीण बनले होते, असा दावा केला होता.