For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरातील घरपट्टीत अखेर 3 टक्के वाढ

06:56 AM Apr 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
शहरातील घरपट्टीत अखेर 3 टक्के वाढ
Advertisement

सर्वसाधारण सभेत निर्णय, तासभर चर्चेचे गुऱ्हाळ : चालू आर्थिक वर्षापासून वाढीव बोजा

Advertisement

प्रतिनिधी   / बेळगाव

शहरातील मिळकतींच्या घरपट्टीत अखेर 3 टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शनिवारच्या महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला. यामुळे बेळगावकरांवर चालू आर्थिक वर्षापासून वाढीव घरपट्टीचा बोजा वाढला आहे. घरपट्टी वाढीच्या निर्णयावरून महापालिकेत जवळपास तासभर चर्चेचे गुऱ्हाळ रंगले. सर्वानुमते चर्चा करून अखेर घरपट्टी वाढीचा निर्णय घेण्यात आला. सध्याच्या घरपट्टीत 3 ते 5 टक्क्यापर्यंत वाढ करण्यात यावी, असा आदेश राज्य सरकारने बजावला आहे. त्यामुळे 24 जानेवारी 2025 रोजी झालेल्या अर्थ स्थायी समिती बैठकीत 4 टक्के घरपट्टी वाढीचा निर्णय घेण्यात आला होता.

Advertisement

सदर प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी शनिवारच्या सर्वसाधारण बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. सुरुवातीला महापौर मंगेश पवार यांनी 4 टक्के घरपट्टी वाढीच्या निर्णयाला सर्वांची सहमती आहे, असे समजून मंजुरी दिली. मात्र बहुतांश नगरसेवकांनी वाढीव घरपट्टीला विरोध केला. बेळगाव शहरात सध्या मंदी असून सर्वसामान्य जनतेकडून वाढीव घरपट्टी वसूल करण्याऐवजी   मोठमोठ्या थकबाकीदारांकडून वसुली करावी. यंदा गतवर्षीच्या तुलनेत 15 कोटी रुपये अधिक महसूल जमा झाला आहे. विनाकारण घरपट्टी वाढीच्या माध्यमातून जनतेवर बोजा टाकू नये. महापालिकेच्या खुल्या जागा भाडेकरार तत्त्वावर देऊन त्याद्वारे उत्पन्न मिळवावे. 4 टक्के घरपट्टी वाढ करण्याऐवजी 3 टक्के करावी, अशी मागणी सरकार नियुक्त सदस्य रमेश सोनटक्की आणि डॉ. दिनेश नाशिपुडी यांनी केली. त्याला सभागृहातील नगरसेवकांनी पाठिंबा दर्शविला.

घरपट्टीत वाढ करणे गरजेचे

घरपट्टी वाढीवरून जवळजवळ तासभर चर्चा करण्यात आली. महापालिका आयुक्त शुभा बी. यांनीदेखील सरकारने 3 ते 5 टक्के घरपट्टीत वाढ करावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे घरपट्टीत वाढ करणे गरजेचे असल्याचे मत बैठकीत व्यक्त केले. काही नगरसेवकांनी सध्या घरपट्टी वाढ नको याबाबत पुढील बैठकीत चर्चा करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानंतर महापौर मंगेश पवार यांनी 4 टक्क्यांऐवजी 3 टक्के घरपट्टी वाढ करण्याचा निर्णय पारित केला. याला सर्व सदस्यांनी सहमती दर्शविली.

Advertisement
Tags :

.