शहर अभियंत्यांना पाच हजारांचा दंड
100 कोटी रस्ते कामातील प्रगती असमाधानकारक, कामाचा दर्जाही निकृष्ट असल्याने प्रशासकांची कारवाई
कोल्हापूर :
नगरोत्थान (राज्यस्तर) मधून 100 कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील 16 रस्ते करण्यात येत आहेत. 9 महिन्यात केवळ 20 टक्के काम पुर्ण झाले असून, झालेले कामही निकृष्ट असल्याने प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी ठेकेदारासह, कन्स्लल्टंट यांना दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली. तर शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, तत्कालीन शहर अभियंता हर्षजीत घाटगे, कनिष्ठ अभियंता निवास पोवार यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. याबाबतची नोटीस सोमवारी बजावण्यात आली.
नगरोत्थान योजनेतून शहरातील 16 रस्ते 100 कोटी रुपये खर्च करुन केले जात आहेत. एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर्स यांना महापालिकेच्या वतीने 14 डिसेंबर 2023 रोजी या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. जानेवारी 2024 मध्ये या कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. 18 नोव्हेंबर 2024 रोजी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी या कामांची पाहणी केली. यावेळी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, ठेकेदार मे.एव्हरेस्ट इनफ्रासस्ट्रक्चर अँड डेव्हलपर्स प्रतिनिधी, प्रकल्प सल्लागार संदीप गुरव अॅड असोसिएट्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी साईट लॅब सुरु न करणे, साईट ऑफिस सुरु न करणे, बारचार्ट न देणे, डांबरीकरण करताना सेन्सर पेव्हरचा वापर न करणे, अशा गोष्टी पाहणीवेळी आढळून आल्या. तसेच कामाच्या ठिकाणचे टेस्टींग केले असता, गुणवत्तेपेक्षा कमी प्रमाणात डांबर वापरल्याचा अहवालही गर्व्हर्मेट पॉलीटेक्नीकडून प्राप्त झाला. यामुळे प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी ठेकेदार कंपनीसहृ प्रकल्प सल्लागार, शहर अभियंता, तत्कालीन शहर अभियंता, कनिष्ठ अभियंता यांना नोटीस बजावली.
15 दिवसांत नियुक्ती का रद्द करु नये
कन्स्ल्टंट संदीप गुरव अॅड असोसिएट्स यांची प्रकल्प सल्लागार म्हणून 13 जानेवारी 2022 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. या कंपनीला नियुक्ती का रद्द करु नये याबाबतचा खुलासा 15 दिवसांत सादर करावा असे पत्र देण्यात आले आहे. प्रकल्प सल्लागार कंपनीने मटेरीयल टेस्टींगसाठी साईट लॅब सुरु करणे, साईट ऑफीस सुरु करणे, कामाची गुणवत्ता न तपासणे, डांबरीकरणाचे काम करताना सेंसर पेव्हरचा वापर न करणे, 11 महिन्यामध्ये 60 टक्के काम पुर्ण होणे अपेक्षीत असताना केवळ 12 ते 15 टक्के काम पुर्ण झाले असल्याचे नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
ठेकेदार कंपनीस दंडात्मक कारवाईची नोटीस
प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर्स या कंपनीसही सोमवारी नोटीस बजावली आहे. यामध्ये कंपनीवर दंडात्मक कारवाई का करु नये याचा खुलासा मागविण्यात आला आहे. कंपनीस वर्क ऑर्डर देवून 10 महिने उलटून गेले आहेत. निविदेप्रमाणे 60 टक्के काम पुर्ण होणे अपेक्षीत होते, प्रत्यक्षात मात्र 12 ते 15 टक्केच काम पुर्ण झाल्याचे दिसून येत आहे. रस्ते प्रकल्पाच्या कामाची प्रगती अत्यंत संथ गतीने असून काम असमाधानकारक आहे. त्याचसोबत कामाच्या गुणवत्तेमध्येही तडजोड केल्याचा शेरा पत्रामध्ये नमूद करण्यात आला आहे. तसेच बिटूमन टेस्ट मध्ये डांबराचे प्रमाण कमी आढळून आल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे.
नेत्रदिप सरनोबत, हर्षजीत घाटगे यांच्यावर दंडात्मक कारवाई
तत्कालीन शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांच्यावर 4 हजार रुपये दंडाची तर शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्यावर 5 हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. रस्ते प्रकल्पातील कामाची प्रगती असमाधानकारक असणे, काम सुरु करणेपूर्वी कंपनीकडून कामाच्या प्रगतीचा बार चार्ट घेणे आवश्यक होते. मात्र तो न घेतल्याचा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला आहे. दोघांनीही 3 दिवसांमध्ये खुलासा सादर करण्याचे आदेशही प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. तसेच कनिष्ठ अभियंता निवास पोवार यांच्यावरही 3 हजार 500 रुपयांच्या दंडात्मक कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. दसरा चौक ते नंगिवली चौक या रस्त्याची पाहणी 18 नोव्हेंबर रोजी करण्यात आली, यावेळी निवास पोवार कामावर हजर नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याचसोबत सासने मैदान जवळील रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून, यावर योग्य देखरेख केली नसल्याचा ठपका ठेवून उपशहर अभियंता रमेश कांबळे यांच्यावरही 1 हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. सर्वांचा दंड हा त्यांच्या वेतनातून कपात करुन घेण्यात येणार आहे.