शहरासह ग्रामीण भाग दीड तास अंधारात
विद्युत केंद्रात आग लागल्याने वीजपुरवठा ठप्प
बेळगाव : इंडालजवळील विद्युत केंद्रामध्ये आग लागल्याने मंगळवारी रात्री तब्बल दीड तास शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा बंद होता. एकीकडे वाढती उष्णता आणि त्यामध्ये लाईट गुल झाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत केला जात होता. परंतु वडगाव परिसरात रात्री उशिरापर्यंत वीज काही येऊ शकली नाही. शहराचा पारा वाढत असल्यामुळे विजेविना पाच मिनिटे राहणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी तब्बल दीड तास वीजपुरवठा ठप्प झाला. रात्री साडेनऊच्या सुमारास वीजकेंद्रातील बिघाडामुळे वीज गुल झाली. शहरात टप्प्याटप्प्याने, तसेच पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. परंतु याचा सर्वाधिक फटका वडगाव उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना बसला. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु वीज येऊ शकली नाही.
मच्छे उपकेंद्रातून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न
220 केव्ही इंडाल स्टेशनमध्ये मुख्य वाहिनीला आग लागल्यामुळे काहीकाळ वीजपुरवठा ठप्प झाला. वडगाव उपकेंद्रामध्ये जाणारी वाहिनी निकामी झाल्याने शहरासह ग्रामीण भागात वीज नव्हती. मच्छे येथील उपकेंद्रातून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू होता.
-ए. एम. शिंदे (साहाय्यक कार्यकारी अभियंता)