केंद्र सरकारच्या कामगार कायद्याला विरोध दर्शवून सिटूचे आंदोलन
अधिसूचनेची प्रत जाळून केला निषेध
बेळगाव : केंद्र सरकारच्या कामगार कायद्याला सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनने (सिटू) तीव्र विरोध दर्शविला आहे. सिटू जिल्हा शाखेचे पदाधिकारी व सदस्यांनी बुधवारी (दि. 26) जिल्हाधिकारी कार्यालय आवारात एकत्र येऊन केंद्राच्याअधिसूचनेची प्रत जाळून निषेध व्यक्त केला. केंद्राने कामगारासंबंधी असलेले 44 कोड रद्दबातल करून केवळ 4 कोड ठेवले आहे.यामुळे कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे. बेरोजगारीही वाढणार आहे. खासगी कंपन्यांना, भांडवलशाहीला प्रोत्साहन देण्याची केंद्राची कृती गैर असल्याचा आरोप करीत केंद्राच्या अधिसूचनेची प्रत जाळून सिटूच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी सिटूचे जिल्हा सचिव जी. एम. जैनेखान, खजिनदार जी. व्ही. कुलकर्णी, उपाध्यक्ष मंदा नेवगी व बाबू जेनानी, सहसचिव तुळसम्मा माळदकर आदी उपस्थित होते.
कामगारविरोधी धोरण न बदलल्यास आंदोलन तीव्र करणार
राज्य सिटूच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्हा केंद्रावर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारने कामगारविरोधी धोरण न बदलल्यास आंदोलन याहून तीव्र करण्यात येईल, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.