पहिल्या-दुसऱ्या रेल्वेगेटजवळील वाहतूक कोंडीला नागरिक वैतागले
बेळगाव : पहिल्या व दुसऱ्या रेल्वेगेटजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक वैतागून गेले आहेत. उत्सव किंवा सण यांची शहरात धामधूम आणि वाहतूक कोंडी हे समीकरण ठरलेलेच आहे. उत्सवाच्या निमित्ताने बाहेर असलेली नोकरदार मंडळी शहरात येतात. त्यामुळे अर्थातच गर्दी वाढते आणि वाहतूक कोंडीही होते. तथापि, पहिल्या आणि दुसऱ्या रेल्वेगेटजवळ होणारी केंडी ही नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी ठरत आहे. उड्डाणपूल होईल तेव्हा होईल. परंतु सध्या तरी येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यातच रेल्वेगेट बंद झाल्यावर किमान पंधरा ते वीस मिनिटे व डबल क्रॉसिंग असले तर त्याहून अधिककाळ तिष्ठत थांबण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. गेट बंद झाल्याने वाहनधारकांना तर जाता येत नाही. परंतु, शाळेची वेळ आणि तत्सम तातडीच्या कामासाठी जायचे असल्यास गेट ओलांडून जाण्याचे धाडस विद्यार्थी व नागरिक करतात. सध्या उत्सवापुरते तरी पहिल्या रेल्वेगेटजवळील बॅरिकेड्स काढून वाहतूक जनतेसाठी खुली करावी. जेणेकरून दुसऱ्या रेल्वेगेटवर होणारी वाहतूक कोंडी कमी होऊ शकते, अशी मागणी होत आहे.