For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भुलू नका... सावध रहा!

11:51 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
भुलू नका    सावध रहा
Advertisement

देवांच्या नावाने पैसे उकळणाऱ्या भामट्यांचा नागरिकांना त्रास

Advertisement

बेळगाव : कधी पाणी मागण्याचे निमित्त करून, कधी पत्ता विचारण्याचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्यांची संख्या कमी नाही. आता स्वामी समर्थांच्या नावाने अन्नदानासाठी 21 हजार रुपये द्या, असे सांगून काही भामटे घरोघरी फिरत आहेत. विशेष म्हणजे महिला घरात एकट्याच आहेत, याची खात्री करून ते येत असल्याने त्यांनी बरीच पूर्वतयारी करत माहिती गोळा केली आहे, हे लक्षात येते. त्यामुळे अशा भामट्यांपासून दूर राहण्याची गरज आहे.

टिळकवाडी, भाग्यनगर परिसरात असे चार भामटे सध्या घरोघरी जाऊन अन्नदानासाठी रक्कम मागत आहेत. प्रथम ते पाणी मागतात, त्यानंतर फेस रिडिंग करतात आणि नंतर इतके पैसे द्या, असे सांगून तगादा लावतात. उपलब्ध माहितीनुसार हे चौघे सकाळी आरपीडी कॉर्नरजवळ एकत्र येतात व कोणी कोणत्या बाजूला जायचे याची चर्चा करतात. त्यानंतर प्रत्येक जण ठरलेल्या भागात जाऊन देणगीसाठी रक्कम मागू लागतो.

Advertisement

अशा व्यक्तींना टाळता येत नाही का? असे विचारता एका महिलेने सध्या पक्षमास आहे, कोण कोणत्या रुपात येईल हे सांगता येत नाही आणि पाणी तर आपण सर्वांनाच देतो. त्यामुळे आधी त्यांचा हेतू लक्षात येत नाही, असे सांगितले. विशेष नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे काही अपार्टमेंटमध्ये वॉचमन आहेत. मात्र हे भामटे वॉचमन कधी नसतो, यावर पाळत ठेवून ती वेळ साधून अपार्टमेंटमधील घरी जात आहेत.

पोलिसांशी संपर्क साधावा...

बेळगावमध्ये स्वामी समर्थांचे मंदिर आहे. मंदिराचे पदाधिकारी किंवा भक्त अशा कोणत्याही रकमेची अपेक्षा करत नाहीत. त्यांचे कार्य भक्तीने व निरपेक्ष भावनेने सुरू आहे. त्यामुळे अशा कोणत्याही देवांच्या, स्वामींच्या नावाने पैसे उकळणारे हे भामटेच आहेत, याचे भान लोकांनी व प्रामुख्याने महिलांनी ठेवावे. अशा व्यक्ती आल्यास त्यांना बोलण्यात गुंगवून पोलिसांशी संपर्क साधावा. कारण यापैकी एक भामटा जरी सापडला तरी पुढील धागेदोरे उकलणे सुकर होणार आहे. अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.