रविवार पेठेतील गटारींच्या अर्धवट कामाचा नागरिकांना फटका
बेळगाव : महानगरपालिकेच्यावतीने रविवार पेठेत बांधण्यात आलेल्या गटारींचे काम अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आले आहे. या अर्धवट कामाचा फटका स्थानिक रहिवाशांना बसत असून सांडपाणी वाहून जाण्याऐवजी त्याच ठिकाणी तुंबून रहात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला असता ठेकेदाराकडून कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी रविवार पेठेतील गटारीचे काम महानगरपालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले होते. मात्र, सदर गटारीचे काम पूर्ण करण्याऐवजी अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आले आहे. बांधकामाचे साहित्य व इतर केरकचरा त्याच ठिकाणी पडून आहे. सांडपाणी वाहून जाण्याऐवजी त्याच ठिकाणी तुंबून रहात असल्याने दुर्गंधीचा सामना करण्याची वेळ आली आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराशी अनेक वेळा नागरिकांनी संपर्क साधून गटारीचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र, ठेकेदाराकडून कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने या अर्धवट कामाचा फटका सहन करण्याची वेळ आली आहे.