शहरातील रस्ते कामांबाबत आज नागरिकांचा बांधकामावर मोर्चा
एकाचवेळी दोन्ही बाजूचा रस्ता खोदल्याने प्रवाशांना नाहक त्रास
खानापूर : राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या शहरांतर्गत जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. काम हेस्कॉम कार्यालयापासून नदी पुलापर्यंत सुरू केले आहे. मात्र एकाचवेळी दोन्ही बाजूचा रस्ता खोदल्याने प्रवाशांना तसेच रुमेवाडी पलीकडील नंदगडपर्यंत तसेच अनमोडपर्यंतच्या प्रवाशाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रुमेवाडी नाका, मासळी मार्केट, जांबोटी क्रॉस ते नदीपर्यंत असलेल्या व्यापारी वर्गालाही याचा फटका बसला आहे. याबाबत प्रकाश चव्हाण, संजय कुबल, प्रमोद कोचेरी, राजू रायका, राजू देशपांडे, गुंडू तोपिनकट्टी यांनी व्यापारी वर्गाबरोबर बैठक घेऊन चर्चा करून या विरोधात नागरिक, व्यापारी व शिष्टमंडळाचा मोर्चा बांधकाम खात्याच्या कार्यालयावर काढण्याचा निर्णय घेतला आहे.
तरी नागरिकांनी सकाळी 10 वाजता शिवस्मारकाकडे जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा रस्ता नंदगड, हल्याळ तसेच गोव्यासाठी संपर्क रस्ता आहे.रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेतल्यानंतर हेस्कॉम कार्यालयापासून ते नदी पुलापर्यंत तसेच रुमेवाडी नाक्यापासून ते करंबळ क्रॉसपर्यंत एकाचवेळी कोणतीही सूचना न देता तसेच रस्ता बंद करून काम हाती घेतले आहे. दोन्ही बाजूच्या रस्त्याचे खोदकाम केल्याने नागरिकांना आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शहरांतर्गत रस्त्यावरुन धावणाऱ्या बसेस बाहेरुन जात आहेत. तसेच हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
व्यापाऱ्यांनाही मोठा फटका
संपूर्ण परिसरातील व्यापाऱ्यांनाही याचा मोठा फटका बसलेला आहे. यासाठी कंत्राटदार व बांधकाम अधिकाऱ्यांनी एक बाजूचा रस्ता कायमस्वरुपी सुरू ठेवावा, अशी मागणी होत आहे. मात्र कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष करून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने नागरिकांनी मोर्चा काढून एका बाजूचा रस्ता सुरू ठेवावा, अशी मागणी करण्यासाठी आज शुक्रवार दि. 17 रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. शहरातील नागरिक, व्यापारी वर्गानी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.