पाकव्याप्त काश्मीरचे नागरीक भारताचेच
कधीना कधी हा भारताचा भाग परत निश्चित येणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पाकिस्तानव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. तो पाकिस्तानने बेकायदेशीररित्या बळकावला आहे. या भागातील नागरीक भारताचेच आहेत. त्यांना भारतात येण्याची इच्छा आहे. ते भारताशी भावनात्मकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या जोडले गेले आहेत. कधीना कधी भारताचाच हा भाग भारताला परत मिळणारच, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी व्यक्त केला आहे. येथील एका कार्यक्रमात ते गुरुवारी भाषण करीत होते. सिंदूर अभियानाच आम्ही पाकिस्तानची आणखी प्रचंड मोठी हानी करण्याची आमची क्षमता होती. तथापि, आम्ही हे अभियान संयमाने हाताळले. आम्ही या केवळ चार दिवसांच्या सशस्त्र संघर्षात पाकिस्तानला मोठा धडा शिकविला आहे. पाकिस्तानने आता सुधारण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी या भाषणात केले आहे.
मने जोडण्याची भाषा
भारत नेहमी मने जोडण्याची भाषा करतो. याच मार्गावर आम्ही अग्रेसर आहोत. एकना एक दिवस आमचे पाकव्याप्त काश्मीरमधील दुरावलेले बंधू आमच्याशी जोडले जाणार आहेत. पाकव्याप्त काश्मीर भारताला परत मिळणार आहे. मी भारताचाच होतो आणि आता भारतात परत आलो आहे, असे हा प्रदेश भारताला सांगणार आहे, असे आपले ठाम विचार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
योग्य समतोल
देशाच्या संरक्षणासाठी मेक इन इंडिया कीती महत्वाचे आहे, हे या अभियानातून सिद्ध झाले आहे. आज आम्ही केवळ युद्धविमाने आणि क्षेपणास्त्र प्रणाली यांचीच निर्मिती करीत नाही आहोत, तर आम्ही नव्या युगातील अत्याधुनिक युद्धव्यवस्थेच्या निर्माण कार्यासाठीही सुसज्ज आणि सक्षम आहोत. ‘सिंदूर’ अभियान हे भारताचे सामर्थ्य आणि संयम यांचे प्रतीक आहे, अशी भलावण त्यांनी केली.
दहशतवादाचा धंदा आतबट्ट्याचा
राजनाथसिंग यांनी पाकिस्तानवरही घणाघात केला. दहशतवाद हा पाकिस्तानचा धंदा झाला आहे. तथापि, हा लाभदायक धंदा असून तो आतबट्ट्याचा आहे. या धंद्यामुळे पाकिस्तानला जबर हानी भोगावी लागली आहे आणि पुढेही भोगावी लागणार आहे. तरीही तो देश हा धंदा सोडत नाही. कारण त्याला विनाशाचेच डोहाळे लागले आहेत, अशा अर्थाचे खोचक विधानही त्यांनी भाषणात केले.
‘स्वदेशी’चा जगाला धक्का
‘सिंदूर’ अभियानात भारताने स्वदेश निर्मित संरक्षण साधनांचा प्रभावी उपयोग केला आहे. या स्वदेशनिर्मित साधनांच्या यशाने साऱ्या जगाला धक्का दिला आहे. शत्रूच्या कोणत्याही शस्त्रांना आणि अडथळ्यांना भेदण्याची क्षमता आमच्या स्वदेशनिर्मित साधनांमध्ये आहे, हे या अभियानात सिद्ध झाले आहे. यामुळे भारताच्या शस्त्रसंशोधकांचा आणि उत्पादकांचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढला आहे. यापुढच्या काळात स्वदेशी शस्त्रनिर्मितीवर अधिकाधिक भर देण्याचे सरकारचे धोरण आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी यावेळी केले.