मूलभूत सुविधा पुरविण्याची गवळीवाड्यातील नागरिकांची मागणी
अनेक सरकारी योजनांपासून कुटुंबे वंचित : आमदारांकडूनही समस्यांची दखल नाही
वार्ताहर/हलशी
नंदगड गावापासून तीन किलोमीटर अंतरावर वाडीमाळ शिवारात गवळी समाज वसलेला आहे. आपला पिढ्यान् पिढी जनावरांचा व्यवसाय सांभाळत असताना सदर समाज गाई, म्हशीच्या दूध उत्पादनावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून मूलभूत सुविधा पुरविण्यात येत नसल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. गवळीवाड्यावर मुलभूत सुविधा पुरवण्यात याव्यात, अशी मागणी गवळीवाड्यावरील नागरिकांनी केली आहे. गवळी वाड्याचा विकास करण्यात यावा, तसेच या ठिकाणी विद्युतपुरवठा, रस्ते, पाणी याची सोय करण्यात यावी, म्हणून लोकप्रतिनिधीना वेळोवेळी भेटून अर्जविनंत्या करूनदेखील गवळीवाड्यावरील समस्या सोडवण्याबाबत लोकप्रतिनिधीनी साफ दुर्लक्ष केले आहे.
समस्यांबाबत बोलताना दादोबा कोळपाटे म्हणाले, गेल्या कित्येक वर्षापासून आम्हाला घरांचे उतारे देण्यात आलेले नाही. या ठिकाणी विद्युतपुरवठा नाही. म्हणून सोलारद्वारे विद्युतपुरवठा करण्यासाठी पॅनल बसविण्यात आले आहेत. मात्र गेल्या दोन वर्षापासून काम अर्धवट राहिल्याने विद्युतपुरवठाही बंद आहे. गवळीवाडा ते नंदगड तीन कि. मी. चे अंतर आहे. या वाड्यावर 25 मुले शिक्षणासाठी नंदगड येथे चालत जातात. मात्र रस्ता नसल्याने गुडघाभर चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांना जावे लागते. यासाठी नंदगड ते गवळीवाडा रस्ता होणे गरजेचे आहे. यावेळी दादोबा कोळपाटे, बाबली कोळपाटे, विठ्ठल गावडे, मांबू गावडे, बज्जू गावडे, जानू गावडे, धाकलू गावडे, नागूबाई कोळपाटे, सखुबाई गावडे, सोनाबाई कोळपाटे, नागूबाई गावडे, चिमणाबाई गावडे, जनाबाई येडगे, लक्ष्मी गावडे उपस्थित होते.
एकाही समस्येची पूर्तता नाही
समस्या जाणून घेण्यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना या ठिकाणी पाठवले होते. मात्र अद्याप एकाही समस्येची पूर्तता करण्यात आलेली नाही. येत्या काही दिवसात रस्ता आणि वीजुपुरवठ्याची सोय करण्यात यावी. तसेच आमच्या हक्काच्या घराचे उतारे देण्यात यावेत, सरकारची लहान मुलांसाठी अंगणवाडी योजना आहे. मात्र या गवळीवाड्यावर अद्याप अंगणवाडी नसल्याने आमची लहान मुले शासकीय योजनांपासून वंचित आहेत. यासाठी या ठिकाणी अंगणवाडी मंजूर करण्यात यावी, असे ते म्हणाले.