नागरिकांनो! शांतता राखा... हत्ती निघून जाईल!
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे यांचे आवाहन : तरुण भारतच्या प्रतिनिधीशी साधला संवाद
बेळगाव : मागील 10 ते 12 दिवसांपासून धुमाकूळ घातलेला हत्ती अद्याप कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवरच स्थिरावला आहे. सैरभैर झालेला आणि मार्ग चुकलेल्या हत्तीबाबत नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी या हत्तीने कंग्राळीपर्यंत मजल मारली होती. बेळगावच्या वेशीपर्यंत आलेल्या या हत्तीची चर्चा सर्वत्र झाली. या हत्तीबाबत सर्वसामान्य आणि वन्य प्रेमींच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. हा हत्ती कोठून आला? आणि कसा आला? याबाबत पाटणे येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे यांच्याशी तरुण भारतच्या प्रतिनिधीने साधलेला संवाद....
► सीमाहद्दीत धुमाकूळ घातलेला हत्ती मूळचा कुठला?
-सीमाहद्दीत आलेला हत्ती आजरा (जि. कोल्हापूर) येथील वनक्षेत्रातला आहे. हा कळपातून बाहेर पडला आहे. मागील दहा वर्षांपासून आजरा डोंगर क्षेत्रात त्याचे वास्तव्य आहे.
► बेळगाव तालुक्यात किंवा सीमाहद्दीत तो कसा आला?
- बेळगाव तालुक्यात तो आजरा येथूनच आला आहे. चिंचणे, कामेवाडी, कमलवाडी डोंगर क्षेत्रातून चंदगड तालुक्यातील दुंडगे, कुदनूर, किटवाड परिसरात आला आणि तेथून सीमाहद्दीत दाखल झाला आहे.
►सद्य परिस्थितीत हत्ती कोठे स्थिरावला आहे?
-कोणत्याही वन्य प्राण्याला नैसर्गिक आधिवास महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो सध्या कौलगे (ता. चंदगड) या सीमाहद्दीवर स्थिरावला आहे. लहान डोंगर क्षेत्र असल्याने पाणी आणि चारा उपलब्ध असल्याने थांबला आहे.
► सीमाहद्दीत आलेल्या हत्तीची जबाबदारी कोणत्या राज्याची?
- सीमाहद्दीत आलेल्या हत्तीची जबाबदारी सर्वांची आहे. वन्यप्राणी मालकी भागात येतात. तेंव्हा त्यांना त्यांच्या मूळ आधिवासात जाण्यासाठी सहकार्य करण्याची जबाबदारी वन खात्याबरोबर प्रत्येक नागरिकाची आहे. नागरिकांबरोबर वन्य प्राण्यांचेही संरक्षण करणे वन खात्याचे कर्तव्य आहे.
►सैरभैर झालेला हत्ती नर की मादी आहे?
- मार्ग चुकून आलेला हत्ती टस्कर म्हणजेच नर जातीचा आहे. साधारण 10 ते 12 वर्षांचा पूर्ण वाढ झालेला हा टस्कर आहे. शिवाय त्याला चाळोबा गणेश या नावाने ओळखले जाते.
►एखाद्या वन्य प्राण्याची ओळख कशी करता ?
- वन्य प्राण्यांना त्यांच्या शारीरिक रचनेवरुन आणि एखाद्या विशिष्ट गोष्टीवरुन त्यांची ओळख ठरते. स्थानिक नागरिक आणि वन खात्याने मागील दहा वर्षांपासून आजरा वन क्षेत्रात असलेल्या या हत्तीला ‘चाळोबा गणेश’ नाव दिले आहे. याच्या उजव्या बाजूच्या सुळ्याला दुखापत होऊन तो तुटला आहे. त्यामुळे तो चाळोबा गणेश टस्कर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
► हत्ती माणसांवर हल्ला करू शकतो का?
- सहसा कोणताही वन्य प्राणी जीवाला धोका वाढल्यास हल्ला करतो. नाही तर आपल्या मार्गाने निघून जातो. चाळोबा गणेश शांत आहे आणि भ्रमण करीत आहे. मात्र लोकांनी सावध राहून सहकार्य करणे गरजेचे आहे.
► हत्ती आणि मानव संघर्ष निर्माण झाला आहे का?
- शेतकरी रात्रंदिवस काबाडकष्ट करुन शेती पिके घेतो आणि वन्य प्राण्यांकडून या शेती पिकांचे नुकसान होते. काहीवेळेला शेतकरी पहारा देतो. यातून वन्य प्राणी आणि मानव संघर्ष निर्माण होतो. शासनाकडून नुकसान भरपाई दिली जात असली तरी यासाठी कागदपत्रे आणि इतर बाबींसाठी नाहक त्रास होतो.
► हत्ती आपला कळप सोडून राहू शकतो का?
- कोल्हापूर वन विभागामध्ये आजरा-चंदगड व पाटणे वनक्षेत्रामध्ये सध्या एकूण 7 वन हत्तींचा वावर असून त्यामध्ये 3 नर हत्ती (टस्कर) असून 1 मादी व इतर लहान पिल्ले असून त्यापैकी चाळोबा गणेश नावाचा हा टस्कर हत्ती स्वतंत्रपणे एकटाच असतो व इतर 2 नर हत्ती (राजा व अण्णा) हे अधूनमधून कळपासोबत असतात.
► मानवी वस्तीत हत्ती किंवा इतर वन्य प्राणी आल्यास काय करावे?
- मानवी वस्तीत वन्य प्राणी आल्यास प्रथमत: प्रशासनाला आणि वन खात्याला कळविणे आवश्यक आहे. वन खाते घटनास्थळी दाखल होईपर्यंत नागरिकांनी शांतता आणि संयम राखणे गरजेचे आहे. शिवाय त्याला मूळ आधिवासात जाण्यासाठी मार्ग मोकळा करुन देणे गरजेचे आहे.
► सीमाहद्दीत आलेल्या हत्तीला मूळ आधिवासात कसे घेऊन जाणार?
- वन्य प्राण्यांचे भ्रमण मार्ग ठरलेले आहेत. आलेल्या मार्गाने हत्ती आपल्या मूळ आधिवासात जाईल. नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. ज्या मार्गाने हत्ती आला आहे त्या मार्गाने तो जाऊ शकतो. त्याला मार्गाचे आकलन असते.
► वनक्षेत्रात चारा, पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे का?
- निश्चितच वातावरण बदलाचा परिणाम, वन्य प्राण्यांवर होतो. चारा, पाणी आणि खाद्याच्या शोधात वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊ शकतात. ज्या ठिकाणी पाणी आणि खाद्य उपलब्ध आहे, त्या ठिकाणी स्थिरावतात.