डेअरी फार्म रस्त्यावरील पथदीप बंद असल्याने नागरिकांची गैरसोय
कॅन्टोन्मेंट प्रशासनाचा गलथान कारभार
बेळगाव : कॅम्प येथील मिलिटरी डेअरी फार्म रस्त्यावरील पथदीप मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी अंधार पसरला असून, वाहनचालकांना वाहने हाकताना अडचणी येत आहेत. तसेच या अंधाराचा फायदा घेऊन अनेक गैरप्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. युनियन जिमखाना प्रवेशद्वारापासून अरगन तलाव गणपती मंदिरापर्यंतच्या रस्त्यावरील पथदीप बंद आहेत. यापूर्वी अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर मध्यंतरी पथदीप सुरू करण्यात आले होते. परंतु, सध्या पुन्हा पथदीप बंद आहेत. सदर महामार्गावरुन हिंडलगा, वेंगुर्ल्यासह अन्य ठिकाणचे नागरिकही प्रवास करत असतात. त्यामुळे रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. परंतु, पथदीप नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अंधाराचा फायदा घेत शहरातील कचरा डेअरी फार्मच्या रस्त्यावर अनेक वेळा टाकला जात आहे. तसेच या रस्त्यावर मद्यपिंनी उच्छाद मांडलेला असतो. याबरोबरच इतर अवैध प्रकार सुरू असल्याने तातडीने पथदीप दुरुस्त करण्याची मागणी कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडे केली जात आहे.