For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार ग्राम पंचायतींचा कारभार रामभरोसे !

11:06 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
चार ग्राम पंचायतींचा कारभार रामभरोसे
Advertisement

स्वतंत्र पीडीओ नाहीच : रिक्त पदे भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष, कामे वेळेत होत नसल्याने ग्रामस्थांचे हाल 

Advertisement

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील चार ग्राम पंचायतींना स्वतंत्र पीडीओ नसल्याने शासकीय कामांसाठी नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. तालुक्यातील 4 पीडीओंना दोन ग्राम पंचायतींची जबाबदारी देण्यात आल्याने ते वेळेत उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे ग्राम पंचायतीचा कारभार रामभरोसे झाला आहे. संबंधित ग्राम पंचायतींना स्वतंत्र पीडीओंची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.तालुक्यात 57 ग्राम पंचायती आहेत. त्यापैकी चार ग्राम पंचायतींना स्वतंत्र पीडीओ नाही. अशा ग्राम पंचायतींवर इतरत्र कार्यरत असलेल्या पीडीओंना काम पहावे लागत आहे.

मात्र दोन ग्राम पंचायतींची जबाबदारी पडत असल्याने ताण वाढू लागला आहे. दरम्यान, पीडीओ वेळेत हजर राहत नसल्याने नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. ग्रामीण भागातील जनतेला शासनाच्या योजना वेळेत मिळाव्यात आणि जनजागृती व्हावी यासाठी पीडीओ आवश्यक आहे. मात्र चार ग्राम पंचायतींना स्वतंत्र पीडीओ नसल्याने नागरिकांची शासकीय कामे प्रलंबित राहू लागली आहेत. नागरिकांना दिवसभर पीडीओंच्या प्रतीक्षेत ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. एका पीडीओवर दोन ग्रा. पं. ची जबाबदारी असल्याने गैरहजर राहण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे कामे रेंगाळू लागली आहेत. तर काही वेळा नागरिकांना कामाविना माघारी परतावे लागत आहे.

Advertisement

तालुक्यातील हिंडलगा, के. के. कोप्प, मुतगा, निलजी, आंबेवाडी, उचगाव आदी ग्राम पंचायतींमध्ये स्वतंत्र पीडीओ नसल्याने नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत.  इतर ठिकाणी कार्यरत असलेल्या पीडीओंना प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय कागदपत्रे, संगणक उतारे व इतर कामे खोळंबली आहेत. संबंधित गावच्या विकासाला खीळ बसली आहे. केवळ बेळगाव तालुक्यापुरता पीडीओंची समस्या मर्यादित नसून संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात पीडीओंची कमतरता आहे. त्यामुळे अनेक ग्राम पंचायतींचा कारभार डळमळीत झाला आहे.

रिक्त पीडीओंच्या जागा भरण्याकडे दुर्लक्ष

राज्यातील पीडीओंच्या रिक्त जागा भरण्याकडे दुर्लक्ष झाल्याने एका पीडीओंवर दोन ग्राम पंचायतींची जबाबदारी पडली आहे. तर काही ग्रा. पंचायतींचा कारभार पीडीओविना सुरू असल्याचे दिसत आहे. सरकारने राज्यातील 247 पीडीओंच्या जागा भरण्यासाठी मे दरम्यान अर्जाचे आवाहन केले होते. मात्र अद्याप ती प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे रिक्त जागाचा प्रश्न कायम आहे.

पीडीओंनी वेळेत हजर राहावे 

सर्व ग्राम पंचायतींना पीडीओ आहेत. मात्र चार ग्रा. पं. वर पीडीओंची नेमणूक करणे शिल्लक आहे. त्यामुळे सध्या इतर पीडीओंवर संबंधित ग्राम पंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र जबाबदारी सोपविलेल्या ग्राम पंचायतींमध्ये पीडीओंनी वेळेत हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

- रामरेड्डी पाटील ता. पं. कार्यकारी अधिकारी  

Advertisement
Tags :

.