चोराच्या उलट्या बोंबा; तर पोलिसांचा उलटा न्याय
लोखंड चोराला रंगेहाथ पकडून दिले तरी बचावाचे प्रयत्न
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. नव्या बांधकामांवरून लोखंडी साहित्य चोरण्याचे प्रकारही वाढले आहेत. शुक्रवारी पहाटे ऑटोरिक्षातून येऊन लोखंड चोरताना एका युवकाला रंगेहाथ पकडून नागरिकांनी चोप दिला आहे. भांदूर गल्ली परिसरात ही घटना घडली असून मार्केट पोलिसांनी मात्र चोर सोडून संन्याशाला त्रास करण्याचा सपाटा सुरू केला आहे. संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत एक रिक्षाचालक जखमी झाला आहे. लोखंड चोरताना रंगेहाथ पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी चोरी करीत होता तर आम्हाला का बोलावले नाही? त्याला मारहाण कशासाठी केला? अशी विचारणा करीत तक्रारदारांनाच धमकावण्याचे सत्र सुरू केले आहे.
भांदूर गल्ली येथे श्रीधर गेंजी यांचे बांधकाम सुरू आहे. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या बांधकामावर आतापर्यंत तब्बल पाचवेळा लोखंड चोरीच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ऑटोरिक्षा उभी करून चालक बांधकामावरील लोखंड रिक्षात भरताना स्थानिक नागरिकांनी त्याला रंगेहाथ पकडून बांधकाम मालकाला याची माहिती दिली. हा प्रकार उघडकीस येताच पहाटे घटनास्थळी गर्दी जमली. रिक्षात भरलेले लोखंड खाली उतरवून जमावाने रिक्षावरही दगडफेक केली. रिक्षाचालकाला चोप देऊन त्याला मार्केट पोलिसांच्या ताब्यात दिले. कपिलेश्वर मंदिराला देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका भाविकाने हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांना सतर्क केले. त्यामुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला.
चोरट्यांची पाठराखण करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे काय?
पहाटे आपण भाडे सोडण्यासाठी भांदूर गल्लीला गेलो होतो. त्यावेळी आपल्याला विनाकारण मारहाण करण्यात आल्याचे रिक्षाचालकाने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे मार्केट पोलिसांनी ज्यांनी चोरीची तक्रार केली, त्यांच्यावरच आरडाओरड सुरू केली आहे. पूर्ण चौकशी करण्याआधीच तक्रारदाराला ओरडण्याच्या प्रकारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत असून चोरीचे प्रकार कमी करण्याऐवजी चोरट्यांची पाठराखण करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे काय? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.