For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर येथील पाणीपुरवठा योजनेसाठी रस्त्याच्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त

12:10 PM Nov 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
खानापूर येथील पाणीपुरवठा योजनेसाठी रस्त्याच्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त
Advertisement

जलकुंभ उभारणी - जॅकवेलचे काम सुरू नसतानाच रस्ते खोदाई

Advertisement

खानापूर : खानापूर शहरात अमृत 2 या नळपाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेच्या पाणीपुरवठ्यासाठी शहात पाईपलाईन घालण्याचे काम गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते खोदण्यात आल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अद्याप पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे मुख्य काम सुरू होण्याअगोदरच शहरातील पाईपलाईन घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते उद्ध्वस्त झाल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पुढील दोन वर्षे टाकी उभारणी आणि इतर कामे सुरू राहणार आहेत. त्यामुळे अगोदरच पाईपलाईन घालण्याचे काम हाती घेण्यात आल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

खानापूर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन नगरपंचायतीने नवीन पाणीपुरवठा योजनेची मागणी केली होती. शासनाने त्याची दखल घेऊन नवीन अमृत 2 ही पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेसाठी 20 कोटी ऊ. चे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या योजनेचे काम हैद्राबाद येथील सीवेट या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. कर्नाटक शहर पाणीपुरवठा महामंडळाकडून ही योजना राबविली जात आहे. शहराच्या जुन्या पाणीपुरवठा योजना निकामी झाल्या असल्याने शहरातील संपूर्ण पाईपलाईन बदलण्यात येणार असून तसेच या योजनेत नव्याने मोठी जॅकवेल बांधण्यात येणार आहे.

Advertisement

पाणी खेचण्यासाठी जॅकवेलच्या ठिकाणी 60 अश्वशक्तीच्या दोन मोटारीद्वारे पाणी खेचण्यात येणार आहे. तसेच शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आंबेडकर उद्यानात 10 लाख लिटरचा जलकुंभ उभारण्यात येणार आहे. तसेच अद्ययावत जलशुद्धीकरण यंत्रणेद्वारे पाणी शुद्ध करून शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या नव्या योजनेत शहरात नव्याने 4500 नळजोडणी मीटरसह देण्यात येणार आहे. त्यामुळे मीटरनुसार पाणी बिल आकारणी होणार आहे. असे असताना नव्या जलकुंभाचे काम अद्याप सुरू नसताना जॅकवेलचे काम सुरू नसताना शहातील रस्ते खोदून पाईपलाईन घालण्याचे काम गेल्या महिन्यापूर्वीपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे.

नव्याने करण्यात आलेले सीसी रोड, डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते खोदून पाईपलाईन घालण्यात आले आहेत. पाईपलाईन घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या चरी मात्र योग्य पद्धतीने बुजवण्यात न आल्याने रस्त्यावर चरी पडलेल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरातील वाहतूक व्यवस्थाच कोलमडली आहे. चरीतून चारचाकी आणि दुचाकी चालवाव्या लागत आहेत. लहान गल्लीबोळातील चरीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या चरी योग्यपद्धतीने बुजवण्यात येऊन यावर काँक्रीट अथवा डांबरीकरण करणे आवश्यक होते. मात्र कंत्राटदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्याच्या मधोमध चरी निर्माण झाल्या आहेत. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दोन इंच व्यासाचे पाईप

शहराला या योजनेद्वारे 24 तास पाणीपुरवठा करणार आहे. यासाठी नव्याने घालण्यात येत असलेली पाईपलाईन ही साध्या कंपनीची काळी पाईप आहे. तीही फक्त दोन इंच व्यासाची आहे. यामुळे योग्यपद्धतीने पाणीपुरवठा होईल का, अशी शंका नागरिकांतून व्यक्त होत आहे. दोन इंच व्यासाची पाईप तीही अंत्यत सुमार दर्जाची असल्याने नागरिकांतून याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पाण्याचे स्त्रोतच उपलब्ध नसल्याने योजनेवर प्रश्नचिन्ह

शहराचा वाढलेला विस्तार आणि शासनाने मंजूर केलेली नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले आहे. प्रत्येक घराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. मात्र या योजनेसाठी जलस्त्रोत्राचा विचारच केलेला नाही. सध्या शहराला पाणीपुरवठा करणारी योजना ही जानेवारीपासून दिवसाआड तर एप्रिलनंतर मलप्रभा बंधाऱ्यात पाण्याचा साठा नसल्याने शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येतो. अशी परिस्थिती असताना जलस्त्रोत्राचा विचार न करता इतकी मोठी पाणीपुरवठा योजना कोणत्या आधारावर राबवण्यात येत आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांचे अक्षम्य दुर्लक्ष

अमृत 2 ही नवी पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत असताना लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी याबाबत सखोल अभ्यास करणे गरजेचे होते. तसेच ही योजना राबवण्याअगोदर जुन्या पाणीपुरवठा योजनेचाही विचार होणे गरजेचे होते. असे असताना 20 कोटी रु. चे अनुदान मंजूर झाल्यानंतर तातडीने या योजनेचे काम हाती घेण्यात आल्याने लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांच्या नाकर्तेपणाबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.