For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाढत्या उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण

11:22 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाढत्या उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण
Advertisement

पारा 38 अंशांवर, जनजीवनावर परिणाम

Advertisement

बेळगाव : दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या शरीराची लाहीलाही होऊ लागली आहे. तापमान वाढीमुळे पारा 38 अंशांच्या पुढे पोहोचला आहे. त्यामुळे वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. या उकाड्यातून थोडासा थंडावा मिळावा यासाठी वळीव पावसाची प्रतीक्षा साऱ्यांना लागली आहे. मागील 15 दिवसात तापमानात उच्चांकी वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पारा अधिक वाढल्याने येत्या दिवसात पुन्हा वाढीव तापमानाला सामोरे जावे लागणार आहे. परिणामी शीतपेयांना मागणी वाढू लागली आहे. तहान शमविण्यासाठी शहाळे, आईस्क्रिम, लिंबू शरबत आणि कोल्ड्रींक्सना मागणी वाढू लागली आहे. विशेषत: दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळले जात आहे. त्यामुळे दुपारी रस्तेही ओस पडू लागले आहेत. वाढत्या उन्हामुळे शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. त्यामुळे पंखा, एसी आणि कुलरचा वापरही वाढला आहे. गतवर्षी झालेल्या कमी पावसामुळे सर्वत्र पाण्याचे संकटही गडद होऊ लागले आहे. त्यातच वाढत्या उष्म्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. मागील आठवड्यात काही ठिकाणी वळिवाचा दमदार पाऊस झाला. मात्र शहर आणि उपनगराला या पावसाने हुलकावणी दिली आहे. वळीव पाऊस झाला नसल्यामुळे दाहकता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. वाढत्या उष्म्याचा मानवी जीवनावरही परिणाम होऊ लागला आहे.

सकाळ-सायंकाळच्या सत्रात कामांना पसंती

Advertisement

वाढत्या उन्हामुळे सकाळी आणि सायंकाळच्या वेळेतच काम करण्याला पसंती दिली जात आहे. पारा 38 अंशांच्या पुढे गेल्याने दुपारच्या वेळी उन्हाचे चटके बसू लागले आहेत. त्यामुळे नागरिक सकाळी आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडू लागले आहेत. बाजारात देखील दुपारच्या वेळी गर्दी कमी पाहायला मिळत आहे.

Advertisement
Tags :

.