Solapur : अकलूजमध्ये सावकारींच्या त्रासामुळे नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न ; पोलिसांची कारवाई
सावकारींच्या त्रासामुळे नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न
अकलुज : अकलूज पोलीस ठाण्यात १० खासगी सावकारांविरुद्ध सावकारी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुनावर गुलमहंमद खान (वय ४८, रा. जुना बाजारतळ, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
अनिल मदने (रा. महादेवनगर, अकलूज), सिद्धार्थ पवार (रा. अकलूज), मनोज साळुंखे (रा. अकलूज), भैय्या दत्तात्रय जगदाळे (रा. सराटी, ता. इंदापूर, जि. पुणे), गुरु पवार (रा. लोणारगल्ली, अकलूज), सोनु मोहिते (रा. संग्रामनगर, अकलूज), गौरव माने (रा. मळोली, अकलूज), अवधुत शेंडगे (रा. वेळापूर, माळशिरस), सचिन खिलारे (रा. अकलूज), विलास मारकड (रा. खुडूस, माळशिरस) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी यांना २०२१ पासून सावकारी करणारे काही जण सतत व्याजाच्या पैशांसाठी त्रास देत होते. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी आरोपी सिद्धार्थ पवार याने त्यांच्या घरी जाऊन गोंधळ घालून, शिवीगाळ करून, पैशांसाठी धमक्या दिल्या. त्याने फिर्यादीच्या पत्नी व मुलांनाही धमकावले. या रोजच्या मानसिक त्रासाला कंटाळून, फिर्यादीने त्याच दिवशी दुपारी बुटेक्स हे विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
नागरिकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात (अपेक्स हॉस्पिटल, अकलुज) दाखल केले. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे जबाब दिला. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पळून गेले असून, अकलूज पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अकलूज पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या आरोपींबद्दल काही माहिती असल्यास किंवा इतर सावकारीच्या तक्रारी असल्यास अकलूज पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.