For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेपॉकचा बालेकिल्ला ढासळला, चेन्नईचा सलग पाचवा पराभव

06:58 AM May 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
चेपॉकचा बालेकिल्ला ढासळला  चेन्नईचा सलग पाचवा पराभव
Advertisement

दणकेबाज विजयासह पंजाब गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी : चहलचे हॅट्ट्रिकसह चार बळी 

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

चेपॉकच्या मैदानावर चेन्नईला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. बुधवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नईचा घरच्या मैदानावर चार गड्यांनी पराभव केला. सलग पराभवामुळे चेन्नईचे यंदाच्या आयपीएलमधील आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईचा संघ 190 धावांत ऑलआऊट झाला. यानंतर पंजाबने विजयासाठीचे लक्ष्य 19.4 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत विजयाला गवसणी घातली. 41 चेंडूत 72 धावांची खेळी साकारणाऱ्या श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले तर युजवेंद्र चहलने हॅट्ट्रिकसह चार बळी घेत पंजाबच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

Advertisement

प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रशीद व आयुष म्हात्रे स्वस्तात बाद झाले. रशीद 11 धावा करू शकला, आयुष म्हात्रेला तर सात धावाच करता आल्या. यानंतर आलेला रवींद्र जडेजा 17 धावांवर बाद झाला होता. त्यामुळे चेन्नईची 3 बाद 48 बिकट अवस्था झाली होती. यावेळी चेन्नईच्या मदतीला धावून आला तो सॅम करन. सॅमने धडाकेबाज फटकेबाजी केली आणि त्याने संघाची धावगती रुळावर आणली. सॅमने यावेळी धमाकेदार फटकेबाजी केली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. पण त्यावर करन थांबला नाही. करनने त्यानंतर तुफानी फटकेबाजी करताना 47 चेंडूत 9 चौकार व 4 षटकारासह 88 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. त्याला यान्सेनने बाद केले. त्यानंतर सर्वांचे लक्ष महेंद्रसिंग धोनीवर लागलेले होते. धोनीने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला. यानंतर युजवेंद्र चहलच्या पहिल्या चेंडूवर त्याने षटकारही मारला. पण त्यानंतरच्या चेंडूवरच तो झेलबाद झाला. धोनीला 11 धावा करता आल्या. चहलने यावेळी धोनीसह चार विकेट्स एकाच षटकात घेतल्या आणि चेन्नईला पिछाडीवर ढकलले. चेन्नईचा संपूर्ण संघ 190 धावांत ऑलआऊट झाला.

अय्यर, प्रभसिमरनची फटकेबाजी

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जच्या डावाची सुरुवात देखील फारशी समाधानकारक झाली नाही. प्रियांश आर्या 15 बॉलमध्ये 23 धावा करुन बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यर व प्रभसिमरन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी साकारत संघाचा विजय पक्का केला. प्रभासिमरन सिंहने शानदार खेळी साकारताना 30 बॉलमध्ये 54 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने तुफानी खेळी साकारताना 41 चेंडूत 5 चौकार व 4 षटकारासह 72 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. प्रभसिमरनला नूर अहमदने त्याला बाद केलं. नेहाल वढेरा मोठी धावसंख्या करु शकला नाही, त्यानं केवळ 5 धावा केल्या. शशांक सिंह 12 बॉलमध्ये 23 धावा करुन बाद झाला. पंजाबने विजयासाठीचे लक्ष्य 19.4 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

दरम्यान, घरच्या मैदानावर चेन्नईचा हा सलग पाचवा पराभव ठरला. सलग पराभवामुळे चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. दुसरीकडे पंजाबचा संघ मात्र 13 गुणासह आता दुसऱ्या स्थानावर  आहे.

संक्षिप्त धावफलक

चेन्नई सुपर किंग्स 19.2 षटकांत सर्वबाद 190 (सॅम करन 47 चेंडूत 88, रविंद्र जडेजा 17, ब्रेविस 32, एमएस धोनी 11, चहल 32 धावांत 4 बळी, अर्शदीप सिंग व मार्को यान्सेन प्रत्येकी दोन बळी, ओमरझाई, हरप्रीत ब्रार प्रत्येकी एक बळी)

पंजाक किंग्स 19.4 षटकांत 6 बाद 194 (प्रियांश आर्या 23, प्रभसिमरन सिंग 54, श्रेयस अय्यर 41 चेंडूत 5 चौकार व 4 षटकारासह 72, शशांक सिंग 23, खलील अहमद व पथिराणा प्रत्येकी दोन बळी).

चहलचे हॅट्ट्रिकसह चार बळी

युजवेंद्र चहलने चेन्नई विरुद्ध सामन्यात शानदार बॉलिंग करत हॅट्ट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे. चहलने 19 व्या ओव्हरमधील शेवटच्या अर्थात सहाव्या बॉलवर नूर अहमद याला आऊट केलं. यूझवेंद्र चहल यासह आयपीएलच्या 18 व्या मोसमात हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला. तसेच चहलच्या कारकीर्दीतील ही दुसरी तर चेन्नई विरुद्धची पहिली हॅटट्रिक ठरली. चहलने याआधी आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्याच्या कारकीर्दीतील पहिलीवहिली हॅटट्रिक घेतली होती. चहल तेव्हाही त्या मोसमात ह्ट्रिक घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला होता.

चहलने 19 व्या ओव्हरमध्ये हा कारनामा केला. या षटकांत फलंदाजीसाठी महेंद्रसिंह धोनी होता. चहलने पहिला बॉल वाईड टाकला. यानंतरच्या बॉलवर धोनीने षटकार मारला. पुढच्याच बॉलवर धोनीची विकेट चहलला मिळाली. धोनीच्या विकेटमुळे आत्मविश्वास वाढलेल्या चहलने त्या ओव्हरच्या शेवटच्या तीन बॉलमध्ये तीन विकेट घेत हॅट्ट्रिक केली. दीपक हुडा, अंशुल कंबोज आणि नूर अहमदची विकेट घेतली.

Advertisement
Tags :

.