कोरिकला हरवून सिनेर तिसऱ्या फेरीत
वृत्तसंस्था/माँट्रियल
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या नॅशनल बँक खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीचा टॉपसिडेड टेनिसपटू यानिक सिनेरने एकेरीची तिसरी फेरी गाठताना कोरिकचा पराभव केला.
पुरूष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात सिनेरने कोरिकवर 6-2, 6-4 अशा सेटसमध्ये मात केली. प्रकृती नादुरुस्तीमुळे सिनेरला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला मुकावे लागले होते. गेल्या जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत सिनेरने अंतिम फेरीत रशियाच्या मेदव्हेदेवचा पराभव करत विजेतेपद मिळविले होते. दुसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात जर्मनीच्या द्वितीय मानांकित व्हेरेव्हने थॉमसनचा 6-1, 6-1 असा पराभव केला. पावसामुळे या स्पर्धेतील काही सामने अर्धवट स्थितीत थांबवावे लागले होते. मेदव्हेदेव आणि सित्सिपेस यांचेही आव्हान दुसऱ्या फेरीत समाप्त झाले. फोकिनाने मेदव्हेदेवचा 6-4, 1-6, 6-2, निशीकोरीने सित्सिपेसचा 6-4, 6-4, रशियाच्या रुबलेव्हने टॉमस इचेव्हेरीचा 7-6(7-3), 6-2, सहाव्या मानांकित कास्पर रुडने डकवर्थचा 6-2, 6-7(5-7), 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान पटकाविले.