सीआयआयकडून महिला उद्योजकांसाठी उत्तम व्यासपीठ
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रतिपादन
बेंगळूर : महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे यावे,यासाठी सीआयआय (भारतीय उद्योग महासंघ)ने महिला उद्योजकांसाठी उत्तम व्यासपीठ निर्माण केले आहे, असे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बेंगळूरमधील एका खासगी हॉटेलमध्ये शुक्रवारी आयोजित चौथ्या सीआयआय परिषदेत त्या बोलत होत्या.महिला उद्योजकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी आमच्या खात्याने अनेक आवश्यक कार्यक्रम जारी केले आहेत. पूर्वी जर पती व्यावसायिक असेल तर पत्नी त्याला मदत करायची. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. महिला उद्योजक बनत आहेत. जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या विकासात महिला उद्योजकांचे योगदान वाढत आहे. ही बाब अत्यंत आनंदाची आहे, असे त्या म्हणाल्या. मी स्वत: दोन कारखान्यांची मालकीण आहे, त्यामुळे मला महिला उद्योजकांच्या अडचणी समजतात. बँक बॅलन्स असेल तरच बँका आम्हाला कर्ज देतात. जर आपल्याकडे धाडस असेल तर आपण काहीही साध्य करू शकतो, असेही मंत्री लक्ष्मी हेब्बलकर यांनी सांगितले.