कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सीआयडीचे डीआयजी-एसपींची संतिबस्तवाडला भेट

12:17 PM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोलीस आयुक्तांनी घेतली शांतता समितीची बैठक : चार जणांचे सीआयडी पथक बेळगावात ठाण मांडून 

Advertisement

बेळगाव : संतिबस्तवाड येथील धर्मग्रंथ पेटविण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यास स्थानिक पोलिसांना अपयश आल्याने सदर प्रकरण पोलीस आयुक्त भूषण  गुलाबराव बोरसे यांनी अधिक तपासासाठी सीआयडीकडे वर्ग केले आहे. त्यामुळे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून बुधवारी सीआयडीचे पोलीस महासंचालक (डीआयजी) शांतनू सिन्हा, पोलीस अधीक्षक शुभन्विता एस. यांनी स्वत: संतिबस्तवाडला भेट देऊन पाहणी केली. त्याचबरोबर  पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शांतता समितीची बैठकदेखील घेतली.

Advertisement

संतिबस्तवाड येथे नव्याने बांधकाम सुरू असलेल्या प्रार्थनास्थळातून मुस्लीम बांधवांचा धर्मग्रंथ चोरून नेऊन अज्ञातांनी तो पेटवून दिला. त्यामुळे या घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात उमटले. या घटनेस जबाबदार धरत तत्कालिन पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांना निलंबित केले. त्याचबरोबर हे कृत्य करणाऱ्यांना तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी दबाव वाढत चालल्याने राज्य सरकारने तडकाफडकी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांची बदली केली.

आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच भूषण बोरसे यांनी संतिबस्तवाडला भेट देऊन माहिती जाणून घेतली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकांची स्थापना करूनदेखील पोलिसांना कोणताच सुगावा लागू शकला नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्तांनी सीआयडीकडे वर्ग केला आहे. लागलीच दोन दिवसांपूर्वीच सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक सुलेमान ताशीलदार व त्यांचे सहकारी बेळगावला दाखल झाले आहेत.त्यांच्याकडून संतिबस्तवाडला भेट देण्यासह ग्रामस्थ व पोलिसांकडून माहिती जाणून घेण्यात आली.

सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक सुलेमान ताशीलदार यांनी यापूर्वी बेळगावात पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावली आहे. त्यामुळे त्यांना बेळगावसंबंधी चांगली माहिती आहे. त्यामुळेच त्यांच्यावर या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंगळवारी सीआयडीचे पोलीस महासंचालक शांतनू सिन्हा यांच्यासह पोलीस अधीक्षक शुभन्विता यांनीदेखील संतिबस्तवाडला भेट देऊन प्रार्थनास्थळाची पाहणी केली. तसेच ज्या ठिकाणी धर्मग्रंथ जाळण्यात आला होता, त्या ठिकाणीदेखील भेट देऊन स्थानिक पोलीस अधिकारी व ग्रामस्थांकडून माहिती जाणून घेतली.

पोलीस आयुक्त भूषण बोरसे, ग्रामीणचे साहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर बी. एम., पोलीस निरीक्षक एन. आय. कट्टीमनीगौडा, पोलीस उपनिरीक्षक लक्कप्पा जोडट्टी यांनीदेखील भेट देऊन अधिकाऱ्यांना आजपर्यंतच्या तपासाची माहिती दिली. एकंदरीत प्रकरणाची माहिती जाणून घेतल्यानंतर सीआयडी डीआयजी शांतनू सिन्हा आणि पोलीस सीआयडी अधीक्षक शुभन्विता पुन्हा बेंगळूरला रवाना झाल्या आहेत. तर सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक सुलेमान ताशीलदार यांच्या नेतृत्वाखाली चार जणांचे सीआयडी तपास पथक बेळगावात ठाण मांडून राहणार आहेत. संतिबस्तवाडला भेट दिल्यानंतर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन बांधवांची शांतता समितीची बैठक घेऊन मते जाणून घेण्यासह मार्गदर्शन केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article