व्हेनेझुएलात सीआयएचे गुप्त अभियान
अध्यक्ष निकोलस मादुरोंना सत्तेवरून हटविण्याचा कट
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएने व्हेनेझुएलात गुप्त अभियान सुरू केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची पुष्टी दिली आहे. सीआयएला व्हेनेझुएलात गुप्त अभियान राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे, तसेच व्हेनेझुएलात थेट अभियान राबविण्याचा विचार सुरू असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.
अमेरिकेच्या सैन्याने अलिकडच्या काळात कॅरेबियन समुद्रात कथित ड्रग तस्करी करणऱ्या नौकांवर अनेक घातक हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या सैन्याने सप्टेंबरपासून आतापर्यंत 5 नौका नष्ट केल्या असून यात 27 जण मारले गेले आहेत. यातील चार नौका या व्हेनेझुएला येथून रवाना झाल्या होत्या.
व्हेनेझुएलातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पोहोचत असतात. हे अमली पदार्थ सागरी मार्गाने तस्करी केले जात असतात, याचमुळे मोठ्या कारवाईचा विचार सुरू असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. सैन्य पर्यायांची योजना तयार केली जात असून यात व्हेनेझुएलात संभाव्य हवाई हल्ले सामील असतील. अभियानाचे अंतरिम लक्ष्य व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटविणे असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे.