संभाव्य उमेदवार यादीवर मंथन
काँग्रेसच्या नेत्यांची बैठक : सिद्धरामय्या, शिवकुमार दिल्लीत
बेंगळूर : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या काँग्रेसने राज्यातील संभाव्य उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी दिल्लीत कसरत सुरू केली आहे. प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार यादी निश्चित करण्याविषयी गुरुवारी वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबते झाली. कोणकोणत्या विद्यमान मंत्र्यांना रिंगणात उतरविता येईल, याविषयी देखील विचारमंथन झाले. शुक्रवारी पुन्हा यावर विस्तृत चर्चा होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे दिल्लीतील बैठकांविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणूक तयारी, निगम-महामंडळांवरील नेमणुका, भारत जोडो न्याय यात्रा यासह विविध राजकीय मुद्द्यांवर गुरुवारी नवी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, वरिष्ठ नेते राहुल गांधी, के. सी. वेणूगोपाल सहभागी झाले. राज्यातील लोकसभेच्या 28 जागांपैकी किमान 20 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट काँग्रेसने बाळगले असून येथील उमेदवार निवडण्याविषयी चर्चा करण्यात आली. सर्व मतदारसंघातील संभाव्य उमेदवार निवडण्यासंबंधी मंत्र्यांनी दिलेला अहवाल जमा करून बंद लखोट्यात हायकमांडकडे सादर करण्यात आला आहे. संभाव्य उमेदवार यादीत प्रत्येक मतदारसंघातून तीन इच्छुकांची नावे सूचविण्यात आली आहेत. काही ठिकाणी एकाच नावाची शिफारस केली आहे. संभाव्य उमेदवार यादीवर दिल्लीत चर्चा झाली असून आणखी एका टप्प्यात सर्वेक्षण केले जाईल. राज्य काँग्रेसकडूनही दोन-तीन बैठका होण्याची शक्यता आहे. राज्यातील विद्यमान 11 मंत्र्यांना लोकसभा निवडणूक रिंगणात उतरविण्यासंबंधी प्राथमिक टप्प्यातील चर्चा झाली आहे. ही बाबही सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच निवडणूक लढविण्यासंबंधी मंत्र्यांची मतेही कळविल्याचे समजते.
बेळगाव मतदारसंघाविषयी कुतूहल
राज्यात भाजप-निजद युतीचे आव्हान मोडून काढण्यासाठी विद्यमान मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्याविषयी गुरुवारी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. ज्या मतदारसंघात पक्षाला कडवे आव्हान आहे, त्या ठिकाणीच मंत्र्यांना उमेदवार म्हणून उभे करण्याचा काँग्रेस हायकमांडने विचार चालविला आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व मिळविण्यासाठी मंत्री सतीश जारकीहोळी यांना तिकीट देण्याविषयी विचार केला जात आहे. मंत्री के. एन. राजण्णा यांना तुमकूर, चामराजनगर मतदारसंघातून मंत्री एच. सी. महादेवप्पा यांना निवडणूक आखाड्यात उतरविण्याविषयी दिल्लीत चर्चा झाल्याचे समजते.
मंड्या मतदारसंघातून सुमलता यांचे नाव पुढे
मंड्या मतदारसंघातील विद्यमान खासदार सुमलता अंबरीश यांनी मागील वेळेस भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. यावेळी भाजप-निजदमध्ये युती झाल्याने सुमलता अंबरिश यांना भाजपचे समर्थन मिळणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्या काँग्रेसमधून निवडणूक लढविण्यास तयार होऊ शकतात. त्यांना तिकीट द्यावे का, याविषयी देखील दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा केली जात आहे. शिवाय कृषीमंत्री एन. चेलुवरायस्वामी देखील मंड्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे येथील उमेदवार निवडीविषयी स्थानिक नेत्यांची मते जाणून घेण्याचा सल्ला वरिष्ठांनी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना दिल्याचे समजते.
कामगार मंत्री संतोष लाड, कोलार किंवा चित्रदुर्गमधून मंत्री के. एच. मुनियप्पा, बळ्ळारीतून बी. नागेंद्र, बेंगळूर उत्तरमधून कृष्णभैरेगौडा यांची नावे वरिष्ठांकडे सुचविण्यात आली आहेत. यापूर्वी काँग्रेसश्रेष्ठींनी किमान 10 मतदारसंघातून विद्यमान मंत्र्यांना उमेदवारी देण्यासंबंधी यादी तयार करण्याची सूचना कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीला दिली होती. त्यामुळे विद्यमान मंत्र्यांपैकी किती जणांना तिकीट देण्यात येणार हे जानेवारी अखेरीस समजू शकेल.