त्याग, प्रेमाचा संदेश देणारा ख्रिसमस आज
कोल्हापूर :
दया, एकता, शांती, प्रेम आणि त्यागाचा संदेश देणारा ख्रिसमस बुधवार 25 रोजी शहर व परिसरात साजरा होत आहे. यानिमित्त ख्रिस्ती बांधवांच्या उपस्थितीत शहरातील आठही चर्चमध्ये सकाळी 10 ते 11 च्या सुमारास उपासना केली जाईल. उपासनेनंतर धर्मगुऊच्या प्रवचनांचे आयोजन करण्यात येईल. यातून शांती, त्याग एकताचे संदेश दिला जाईल. हे संदेश स्वीकारतानाच ख्रिस्ती बांधवांकडून एकमेकांना अलिंगण देत पूर्वीपासूनचा आपलेपणा अधिक घट्ट केला जाईल. मेरी ख्रिसमसचा तर दिवसभर बोलबाला होत राहिल. आकर्षक भेटवस्तू देतानाच एकमेकांचे गोडधोड केक, डोनेट, फराळ भरवून तोंडही गोड केले जाईल.
दरम्यान, ख्रिसमसनिमित्त न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरिअल चर्चमध्ये 4 सत्रात उपासना करण्यात येईल. यापैकी सकाळी 8 वाजता येशू ख्रिस्तांच्या जन्मावर आधारीत इंग्रजीतून उपासना करण्यात येईल. यानंतर पावणे दहा वाजता मराठीतून पहिली उपासना, सव्वा अकरा वाजता मराठीतून दुसरी उपासना, आणि दुपारी साडे बारा वाजताही मराठीतूनच तिसरी उपासना केली जाईल. प्रत्येक उपासनेनंतर रेव्हरंड डेव्हिड समुद्रे यांचे प्रवचन होईल. सायंकाळी 6 वाजता महापालिकेजवळील ब्रिटीश कालीन शहर उपासना मंदिरातही (वायल्डर मेमोरिअल चर्च) उपासना करण्यात येईल. याही उपासनेनंतर समुद्रे यांच्याकडून प्रवचन देण्यात येईल.
दरम्यान, ख्रिसमसच्या पुर्वसंध्येला अनेक ख्रिस्ती कुटुंबांनी आपल्या घरात ‘प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मावर आधारीत देखावे तयार केले आहेत. सांताक्लॉजच्या प्रतिकृतीचीसुद्धा उभारणी केली आहे. दुसरीकडे क्वायर संघाने न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये भक्तीगीते म्हणून ख्रिसमसच्या माहोलाला सुऊवात केली होती. अन्य ठिकाणच्या क्वायर संघांमधील गायकांनी तर शहरातील अनेक ख्रिस्ती बांधवांच्या घरी जाऊन येशू ख्रिस्तांच्या जन्मावर आधारीत गाणी सादर कऊन प्रसन्नता पसरवली होती.
ख्रिसमसच्या स्वागतासाठी महापालिकेजवळील वायल्डर मेमोरियल चर्च, न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरिअल चर्चबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरील ख्राईस्ट चर्च, ब्रह्मपुरीवर ब्रह्मपुरी चर्च, ऑलसेंट चर्च, होलिक्रॉस रोमन कॅथॉलिक चर्च, सेव्हंथ-डे अॅडव्हेंटीस्ट चर्च, विक्रमनगर चर्च आदी चर्चना विद्युत रोषणाई केली आहे.
ख्रिस्ती बांधवांनी चांदण्या लावून घराची दर्शनी उजळून सोडली आहे. घराच्या अंतरंगातही जिंगल बेल्स, ख्रिसमस-ट्री, फुलांच्या लटकणी, शोपीस, घंटा, रेनडिअर प्राणी, चॉकलेटस्, एलईडी लाईटने आकर्षक सजावट केली आहे.
सायंकाळी तर ठिकठिकाणच्या बाजारपेठेत ख्रिस्ती बांधवांनी मदर मेरी व प्रभू येशूंच्या प्रतिमेसह स्ट्रॉबेरीकेक, प्लम केक, मिक्स फ्रुटकेट, चीझकेक, फ्रुटकेकसह मिठाई, जिंगल बेल्स, पुडिंग्ज, फराळ, डोनेट, सांताक्लॉजची प्रतिकृती, सांता टोपी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. खरेदीचा आनंद लुटत लटत ख्रिस्ती बांधव एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत होते. त्यामुळे संपूर्ण वातावरण प्रभू येशूमय होऊ गेले होते. अशा वातावरणात रात्री उशिरापर्यंत खरेदी केली जात होती.