बांगला देशात 3 हिंदू मंदिरांचा विध्वंस
वृत्तसंस्था / ढाका
बांगला देशात हिंदूविरोधी हिंसाचार बळावतच चालला असून शनिवारी तीन हिंदू मंदिरांवर इस्लामी कट्टर धर्मवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात तीन्ही मंदिरांचा विध्वंस करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये या देशात हिंदूंच्या अनेक मूर्ती फोडण्यात आल्या आहेत. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
शुक्रवारी या देशातील मैमनसिंग जिल्ह्यात हलुआघाट येथे दोन मंदिरांची तोडफोड करण्यात आली आणि मूर्तींची विटंबना करण्यात आली आहे. शाकुई संघ येथे बोंडेरपारा समाजाची मंदिरे फोडण्यात आली आहेत. या प्रकरणांमध्ये अद्याप कोणतीही तक्रार सादर करण्यात आलेली नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तर तक्रार नोंदवूनच घेतली जात नाही, असे स्थानिक हिंदूंची व्यथा आहे. हिंदूंविरोधात हिंसाचार होत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेतात आणि दंगलखोरांनाच चिथावणी देतात, अशी तक्रार अनेक हिंदूंकडून केली जात आहे.
काली मंदिरावर हल्ला
हलुआघाट येथील प्रसिद्ध पोलीशकांडा काली मंदिरावर गुरुवारी हल्ला करण्यात आला होता. कालीमतेची मूर्ती या हल्ल्यात खंडित करण्यात आली होती. गेल्या मंगळवारी बीरगंज येथे काली मंदिरात 5 मूर्तींची तोडफोड करण्यात आली होती. 2024 या वर्षात आतापर्यंत हिंदूंवर 2,200 हल्ले झालेले आहेत. पण हल्लेखोरांना अटक करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे, अशी माहिती देण्यात आली.