छत्तीसगडमध्ये अटकेतील ननच्या सुटकेसाठी ख्रिस्ती बांधवांचा मोर्चा
बेळगाव : छत्तीसगडमध्ये केरळमधील दोन पॅथोलिक नन आणि एका आदिवासी युवकाला अटक करण्यात आली आहे. याविरोधात बेळगाव ख्रिस्ती समुदायाकडून मूक निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच सदर अटकेत असलेल्यांची त्वरित सुटका करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हा मोर्चा पॅथोलिक असोसिएशन ऑफ बेळगाव व इतर ख्रिस्ती संघटनांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या निवेदनात, 25 जुलै रोजी दुर्ग रेल्वे स्थानकात दोन नन आणि आदिवासी तरुणाला बेकायदेशीररित्या अटक करण्यात आली. त्यांना मानव तस्करी व धर्मांतराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
मात्र अटकेतील तिघेही नारायणपूर येथून तीन प्रौढ आदिवासी मुलींना आग्रा येथे नर्सिंगच्या नोकरीसाठी घेऊन जात होते. या महिलांकडे पालकांची लेखी संमती व ओळखपत्रही होते. शिवाय या तरुणी स्वेच्छेने आणि कोणत्याही दबावाशिवाय प्रवास करत होत्या. मात्र त्यांच्यावर खोटे आरोप करून एफआयआर दाखल करण्यात करून त्यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे त्यांची त्वरित सुटका करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बिशप डेरेक फर्नांडिस, रेव्ह. फादर फिलिप कुट्टी, रेव्ह. नुऊद्दीन मुळे, क्लारा फर्नांडिस, लुईस रॉड्रिग्स, फादर प्रमोद कुमार, सिस्टर पास्टर अंकलगी, सिस्टर लोर्ड जोसेफ यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.